पुणे, दि. १०: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२६ लढविणारे उमेदवार यांच्या प्रचाराकरिता उमेदवार आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधी यांना वाहन परवानगी देण्याचे अधिकार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले यांनी जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रम सुरू असून आचारसंहिता लागू आहे. या निवडणुका लढवित असलेल्या उमेदवारांची अंतीम यादी शुक्रवारी (दि. ९) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निवडणूक लढविणारे उमेदवार, उमेदवार यांचे निवडणूक प्रतिनिधी उमेदवारांच्या प्रचाराकरीता पुणे विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये वाहनास परवानगी मिळणेबाबत मागणी करीत आहेत. त्यानुसार निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना ज्या जिल्ह्यामध्ये वाहनांची नोंदणी आहे, त्या जिल्ह्यात पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांकरिता वाहन परवानगी सुलभ व तात्काळ मिळण्यासाठी त्या जिल्ह्यातील संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर स्थापन केलेल्या एक खिडकीमधून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींचा अवलंब करुन वाहन परवानगी देण्यात येणार आहे.
0000


