Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसह्याद्री स्टार्टअप्सकडून विद्यार्थ्यांसाठी ड्रोन इनोव्हेशन उपक्रम

सह्याद्री स्टार्टअप्सकडून विद्यार्थ्यांसाठी ड्रोन इनोव्हेशन उपक्रम

पुणे: ‘सह्याद्री स्टार्टअप्स’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘ड्रोन इनोव्हेशन’ उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती आणि प्रत्यक्ष उद्योगजगताचा अनुभव देण्यात आला. हा कार्यक्रम सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स (Cerebrospark Innovations Pvt. Ltd.) या ड्रोन क्षेत्रातील स्टार्टअपच्या सहकार्याने पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष उद्योगातील कामकाजाची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या संस्थापक गणेश थोरात, मिहीर केदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या उद्योजकीय प्रवासाबाबत माहिती दिली. स्टार्टअप उभारणीतील आव्हाने, संधी आणि ड्रोन क्षेत्रातील वाढत्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ड्रोनची रचना, त्यातील महत्त्वाचे घटक तसेच विविध क्षेत्रांतील उपयोग याची माहिती देण्यात आली. संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची संधी मिळाली.

या उपक्रमामध्ये संशोधन व विकास प्रयोगशाळेचा (R&D Lab) अनुभवही विद्यार्थ्यांना देण्यात आला. येथे ड्रोनचा वापर सुरक्षा, सर्वेक्षण आणि संशोधनासाठी कसा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ड्रोन उड्डाणाचा प्रत्यक्ष अनुभव. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रोन उडविण्याची संधी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना नियंत्रण, स्थिरता आणि सुरक्षेचे मूलभूत तत्त्व समजण्यास मदत झाली.

या उपक्रमाबाबत सह्याद्री स्टार्टअप्सचे संस्थापक सलील उरुणकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होते.”

विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून हा अनुभव प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही अशा अनुभवाधारित उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस सह्याद्री स्टार्टअप्सने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments