पुणे : खेळांसाठी मैदान शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खेळाचे आरक्षण असलेली ठिकाणे शोधावी लागतील. अनेक ठिकाणी सिंचन आणि बीडीपी झोनमधील जागा पडून आहेत. त्यावर इमारतीच्या माध्यमातून विकास करायचा नाही तर या सिंचन आणि बीडीपी झोनमधील जागा क्रीडांगणासाठी वापरता येतील. पालकांनी खेळांकडे मुलांचे करिअर म्हणून बघायला हवे. सन्मित्र संघाकरिता पूरक असे संकुल डिसेंबर २०२६ पर्यंत करूया, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सन्मित्र संघ, पुणे शतकपूर्ती विशेष कार्यक्रम च्या निमित्ताने ‘१०० खेळाडूंच्या प्रशिक्षण संकल्पाचे पूर्णत्व’ आणि स्थानिक प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा कोथरुडमधील सन्मित्र संघाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, संघाचे अध्यक्ष माणिकराव हळबे, कार्याध्यक्ष दिवाकर निमकर, सचिव वसंत कुलकर्णी,आदी उपस्थित होते. माणिकराव हळबे यांनी यावेळी १ लाख रुपयांची देणगी सन्मित्र संघाला दिली
कार्यक्रमात सन्मित्र संघाने शताब्दीनिमित्त केलेल्या ‘१०० खेळाडूंच्या प्रशिक्षण संकल्पाचे पूर्णत्व यावेळी झाले. यावेळी ५ खेळाडूं व त्यांच्या प्रशिक्षकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. पुणे मनपा मधील नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र उर्फ बापू मानकर, मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, पुनित जोशी यांचा सन्मान करण्यात आला.
जगन्नाथ लकडे म्हणाले, सन्मित्र संघाने १०३ वर्षात चांगली वाटचाल केली आहे. अनेक खेळाडू येथे घडले आहेत. सीएसआर आणि दत्तक खेळाडू संकल्पनेतून अनेक खेळाडू घडू शकतील. आज मैदाने आणि सोयी – सुविधा कमी आहेत. त्यातून सन्मित्र संघासारख्या संस्थांनी खेळ सुरु ठेवले आहेत. इतर देशांमध्ये खेळाला महत्व आहे. लहान वयात मुलांना खेळाकडे नेण्यास चळवळ उभी करणे गरजेचे आहे. रुग्णालयांची संख्या कमी करण्यासाठी मुले मैदानात येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पुनीत जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. दिवाकर निमकर यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. सहकार्यवाह शिरीष मोरे यांनी आभार मानले.


