पुणे : किडनीचे आजार हे केवळ माणसांपुरते मर्यादित नसून हल्ली ते कुत्र्यांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. वेळीच आणि प्रगत उपचार मिळाल्यास अशा गंभीर अवस्थेतूनही जीव वाचू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण नुकतेच पुण्यात पाहायला मिळाले. पुण्यातील द स्मॉल अॅनिमल क्लिनिAgक येथे डॉ. नरेंद्र परदेशी यांनी मूत्रपिंड निकामी झालेल्या शेल्बी या ५ वर्षांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला डायलिसिसच्या मदतीने नवे आयुष्य मिळवून दिले.
बेळगावीतील डोड्डनवर कुटुंबात त्यांचा पाळीव कुत्रा शेल्बी हा त्यांच्या घरातील सर्वात लाडका सदस्य आहे. नेहमी खेळकर आणि उत्साही असलेला शेल्बी काही दिवसांपासून शांत, अशक्त आणि उदास दिसत होता. त्याने खाणे-पिणे कमी केले तसेच उलट्या, अशक्तपणा आणि भूक मंदावणे अशी लक्षणे दिसू लागली. १५ मार्चपासून बंगळुरूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र १५ दिवस रुग्णालयात दाखल करुनही त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर ३१ मार्च रोजी त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाल्याने त्याला इच्छामरणाचा सल्ला देण्यात आला.
मात्र शेल्बीच्या कुटुंबाने हार मानली नाही. त्यांनी पुण्यातील द स्मॉल अॅनिमल क्लिनिककडे धाव घेतली. १ एप्रिल २०२६ रोजी शेल्बीला अतिशय गंभीर अवस्थेत येथे दाखल करण्यात आले. दोन्ही किडन्या गंभीररीत्या बाधित झाल्या होत्या आणि त्याची जगण्याची शक्यता अत्यंत कमी होती.
डॉ. नरेंद्र परदेशी यांनी सांगितले की, शेल्बी क्लिनिकमध्ये दाखल होताच त्याची सोनोग्राफी, ईसीजी, रक्तदाब तपासणी आणि रक्तचाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये क्रिएटिनिनची पातळी ६.०६ mg/dL इतकी धोकादायकरीत्या वाढलेली आढळली. त्यामुळे गंभीर किडनी निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. टिक फीव्हर हे किडनीचे कार्य बिघडण्साचे एक मुख्य कारण असल्याचे यावेळी निदान झाले.
प्रकृतीचे गंभीर्य लक्षात घेता शेल्बीला चार सायकल हेमोडायलिसिसचा सल्ला देण्यात आला. तसेच किडनी प्रत्यारोपण हा दुसरा पर्याय ठेवण्यात आला. विलंब न करता तातडीने डायलिसिस सुरू करण्यात आले. डायलिसिसमुळे रक्तातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि किडनीला पुनर्प्राप्तीसाठी पुरेसा वेळ मिळतो.
पहिले डायलिसिस १ एप्रिल रोजी करण्यात आले. त्यानंतर एक दिवसआड उपचार सुरू ठेवण्यात आले. प्रत्येक सत्रानंतर शेल्बीच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. ७ एप्रिल रोजी तिसऱ्या डायलिसिसनंतर क्रिएटिनिनची पातळी ४.८५ mg/dL वर आली. त्यानंतर डायलिसिस थांबवून तोंडी औषधोपचार सुरू करण्यात आले.
डॉ. नरेंद्र परदेशी यांनी सांगितले की, हळूहळू शेल्बीने उपचारांना प्रतिसाद देत स्वतः खाणे-पिणे सुरू केले. त्याच्या लघवीचे प्रमाणही सुधारले. १७ एप्रिलपर्यंत क्रिएटिनिनची पातळी आणखी कमी होऊन ३.५२ mg/dL झाली. फॉलो-अप सोनोग्राफीमध्ये दोन्ही किडन्यांमधीव रक्तप्रवाह सुधारल्याचे दिसून आले.
सध्या शेल्बीची प्रकृती स्थिरावली असून तो सक्रिय झाला आहे. तो गेल्या दहा दिवसांपासून स्वतः किडनी रुग्णांसाठी विशेष तयार केलेला रेनल डाएट घेत आहे. इंजेक्शन आणि आयव्ही फ्लुइड्स पूर्णपणे बंद करण्यात आले असून किडनीचे कार्य दिवसेंदिवस सुधारत आहे. पुढील आठवड्यात त्याला घरी देखील सोडणार आहे.
क्लिनिकमधील धनश्री आणि तनुजा यांनी शेल्बीची विशेष काळजी घेतली. अत्यंत अशक्त अवस्थेत असताना त्याला खाऊ घालणे आणि देखभाल करणे यामुळे त्याच्या पुनर्प्राप्तीत खुप मोठी मदत झाली.
शेल्बीच्या पालकांनी सांगितले की, शेल्बीला अशा अवस्थेत पाहून आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. इच्छामरणाचा सल्ला मिळाल्यावर तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली, पण तरी आम्ही आशा सोडली नाही. आज तो पुन्हा आमच्यासोबत आनंदात आहे, ही आमच्यासाठी चमत्कारासारखी गोष्ट आहे. डॉ. नरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो. शेल्बी आमच्यासाठी केवळ पाळीव प्राणी नाही, तर कुटुंबातील एक महत्त्वा
चा सदस्य आहे.


