पुणे, दि.१५ : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी १९५ जुन्नर विधानसभा मतदार संघातील आंबोली व आपटाळे या दुर्गम आदिवासी भागात विविध उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
पुणे जिल्हा स्वीप अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय गटामार्फत जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या आंबोली गावात विद्यार्थी व शिक्षकांद्वारे चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी मतदान जनजागृतीची तसेच मतदानाची शपथ घेतली. याप्रसंगी उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे यांनी ‘लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. आंबोली शाळेच्या मुख्याध्यापिका पुनम तांबे यांनी गावकऱ्यांना मतदान जनजागृतीपर क्यूआर स्टिकरद्वारे मतदार यादीत नाव कसे शोधावे याबाबत मार्गदर्शन केले.
पेसा क्षेत्रातील आपटाळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मतदान जनजागृतीपर सेल्फी पॉइंटद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदान हा लोकशाहीचा गाभा असून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाहीप्रती असलेले आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन पुणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अनिता शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य त्याचप्रमाणे पालक, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.


