पुणे : थोर देशभक्त, असीम आणि पराकोटीचा त्याग केलेले व्यक्तिमत्व आणि ब्रिटिशांविरोधात झुंजणाऱ्या स्वा. सावरकरांचे नाव आपण आदराने घेतो. त्यांच्याविषयीचे वाचन महत्वाचे आहे. असीम त्यागाचे व्रत, त्यांचे स्मरण हे आपले कर्तव्य आहे, असे मत लेखक व अभ्यासक प्रा.डॉ.श्रीरंग कंदलगावकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त ग्राहक पेठेतर्फे सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांच्यासह ग्राहक पेठेचा सर्व सेवकवर्ग आणि नागरिक उपस्थित होते.
प्रा.डॉ.श्रीरंग कंदलगावकर म्हणाले, ज्यांनी अंदमानचे वास्तव्य पाहिले आहे, ते कोणाही स्वातंत्र्य सैनिका बद्दल उलटेसुलटे बोलणार नाही. विदेशी कपड्याची होळी सावरकरांनी पुण्यात केली. त्यांचे एकतरी पुस्तक आपण वाचावे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आपण वाचावा.
सूर्यकांत पाठक म्हणाले, आज आपण सावरकर जयंती साजरी करत आहोत, पण खरा सन्मान तेव्हाच होईल जेव्हा आपण त्यांच्या विचारांतील राष्ट्रप्रेम आपल्या आचरणात आणू. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणे, समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, स्वत:च्या कर्तव्याचे प्रामाणिक पालन करणे, हीच खरी सावरकरांना आदरांजली ठरेल. आजही सावरकरांचे विचार लाखो तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय जोशी यांनी केले. आभार भीमाशंकर मेरू यांनी मानले.


