पुणे, दि. 8 (जिमाका, वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र. ३.१ व २, विश्रांतवाडी, पुणे येथे सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ११ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार मोफत देण्यात येणार आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, बेडिंग साहित्य आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच स्टेशनरी, गणवेश, शैक्षणिक सहल, निर्वाहभत्ता व इतर शैक्षणिक बाबींसाठी शासन नियमानुसार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ असून पात्र विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.
0000


