पुणे :* भारतात प्रथमच पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या अशा दोन आजारांशी झुंज देणाऱ्या नवजात बाळाचे प्राण वाचवून त्याला नवे आयुष्य मिळवून दिले.सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया (SVT) आणि नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस (NEC) या दोन गंभीर स्थितींवर एकाच वेळी यशस्वी उपचार करण्याची ही भारतातील पहिलीच घटना ठरली आहे.
*नवजात शिशु विभागाचे प्रमुख डॉ. उमेश वैद्य, डॉ. सिद्धार्थ मदभुशी आणि डॉ. अनुषा राव या नवजात शिशु विभागाच्या चमुच्या नेतृत्वाखाली, तसेच प्रसूती तज्ञ डॉ. भक्ती धामणगावकर, बालहृदयरोग तज्ञ डॉ. आशिष बनपूरकर आणि बाल शल्यचिकित्सक डॉ. अभिजीत बेनारे यांच्या तज्ञ सहकार्याने या नवजात बाळावर यशस्वी उपचार करण्यात आले.* जीवघेण्या हृदयाच्या विकारावर नियंत्रण आणि गुंतागुंतीची आतड्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत या बाळाला नवे आयुष्य मिळवून दिले आहे.
*पुण्यातील ३१ वर्षीय लता खन्ना (नाव बदललेले आहे)* यांना गर्भधारणेच्या ३५ आठवड्यांतच आपत्कालीन सिझेरियनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी २.७४० किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. जन्मानंतर काही तासांतच बाळाला नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आणि २८ फेब्रुवारीपर्यंत याठिकाणी उपचार सुरू होते.
*प्रसुतीतज्ज्ञ डॉ. भक्ति धामणगावकर सांगतात की,* जन्मापूर्वीच बाळाच्या हृदयाची गती ३०० प्रति मिनिट इतकी वाढलेली आढळली. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन तातडीने सिझेरियन करण्यात आले. जन्मानंतर बाळाने रडून प्रतिसाद दिला, मात्र त्यानंतर लगेचच त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि एनआयसीयुमध्ये हलवावे लागले.
जन्मानंतर काही तासांतच बाळाच्या हृदयाची गती पुन्हा अनियंत्रित होऊ लागली. त्याला सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया (SVT) असल्याचे निदान झाले. या अवस्थेत हृदय इतक्या वेगाने धडधडते की शरीराला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. औषधोपचारांनंतरही ही स्थिती वारंवार उद्भवत होती. पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशीष बनपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाला सतत निरीक्षणात ठेवण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याने डिफिब्रिलेटरही( शॅाक मशीन) तयार ठेवण्यात आला होता.
या हृदयाच्या समस्येचा परिणाम बाळाच्या आतड्यांवर होऊ लागला. प्रत्येक SVT एपिसोडमुळे आतड्यांकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होत होता. चौथ्या दिवशी पोट फुगणे आणि रक्तस्रावास सुरू झाला. तपासणीत नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस (NEC) असल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती सहसा अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये दिसते, मात्र या प्रकरणात हृदयाच्या समस्येमुळे ती निर्माण झाली होती, ज्याला तज्ज्ञ वैद्यकीय भाषेत Acquired Neonatal Intestinal Disease (ANID) असे म्हणतात.
आठव्या दिवशी आतड्याला छिद्र पडल्याने शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. अभिजीत बेनारे यांनी जवळपास दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत आतड्याचे खराब झालेले दोन भाग काढून ते पुन्हा जोडण्यात आले.
यानंतर बाळाला काही दिवस तोंडावाटे अन्न देता येत नव्हते. त्याला टोटल पॅरेंटेरल न्यूट्रिशन (TPN) द्वारे आहार देण्यात आला. हृदयाच्या स्थितीकरिता औषधेही पर्यायी मार्गाने देण्यात आली. व्हेंटिलेटर सपोर्ट, अँटिबायोटिक्स आणि सतत निरीक्षण यामुळे उपचारांची गुंतागुंत वाढली.
*डॉ. सिद्धार्थ मदभुशी (अंकुरा हॉस्पिटल, औंध येथील नवजात शिशु तज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक) म्हणाले,* जेव्हा नवजात बाळात हृदय आणि आतडे दोन्ही गंभीर अवस्थेत असतात, तेव्हा प्रत्येक निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या प्रकरणात सर्व विभागांनी एकत्रितपणे काम केले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
*अंकुरा हॉस्पिटल, औंध येथील नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. अनुशा राव यांनी सांगितले,* १८ व्या दिवशी बाळाला हळूहळू आहार देण्यास सुरुवात झाली आणि तो चांगला प्रतिसादही देत होता. २६ दिवसांच्या उपचारांनंतर बाळाला २.३६५ किलो वजनासह घरी सोडण्यात आले व वेळोवेळी फॅालोअप व तपासणीचा सल्ला देण्यात आला.
तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार भारतात असे प्रकरण प्रथमच यशस्वीरीत्या हाताळले गेले असून जगभरातही अशी खुपच कमी उदाहरणे आहेत.
*बाळाच्या पालकांनी सांगितले,* हा संपुर्ण प्रवास आमच्यासाठी भावनिकदृष्ट्या खुपच आव्हानात्मक होता. डॉक्टरांनी वेळीच केलेल्या उपचारांमुळे आमचे बाळ आज सुरक्षित आहे.
जेव्हा हे बाळ घरी गेले, तो क्षण आमच्यासाठी खुप मोठा क्षण होता. नवजात अतिदक्षता विभागातील उपचारांचे ते २६ दिवस हा त्याच्या आईसाठी खुप मोठा काळ होता. अखेर तो दिवस आला आणि ते बाळ आईच्या कुशीत परतले याचा आम्हाला अतिशय आनंद होतो *अशा भावना डॉ. सिद्धार्थ मदभुशी
यांनी स्पष्ट केल्या.*


