Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाखेतील व्यक्तिनिर्माणातून समाज परिवर्तनाचे कार्य करा प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांचे...

शाखेतील व्यक्तिनिर्माणातून समाज परिवर्तनाचे कार्य करा प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांचे आवाहन; व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संघ शिक्षा वर्गाचे उद्घाटन

 

 

पुणे, २० जून २०२६ :

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा आता संपूर्ण समाजाने स्वीकार केला आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी शाखेतील व्यक्तीनिर्माणातून समाज परिवर्तनाचे कार्य करावे,” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह महेश करपे यांनी स्वयंसेवकांना केले.

 

नूतन मराठी प्रशाला येथे आयोजित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संघ शिक्षा वर्गाच्या उद्घाटन सत्रात करपे बोलत होते. यावेळी वर्गाधिकारी डॉ. दत्तात्रय मनोहर गर्गे आणि वर्ग कार्यवाह आमोद कालगावकर उपस्थित होते.

 

महेश करपे म्हणाले, “समाजातील सर्व प्रकारचे भेद विसरून हिंदू समाज संघटित व्हावा, यासाठी डॉ. हेडगेवार यांनी ‘शाखा’ हे तंत्र दिले. व्यायाम, खेळ आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून समाजाचा विचार करणारे देशभक्त नागरिक या शाखांमधून निर्माण झाले. स्वयंसेवकांमधून उत्तम कार्यकर्ता घडवण्याचे केंद्र म्हणजे ‘संघ शिक्षा वर्ग’ होय. या वर्गांमध्ये वेळेचे व्यवस्थापन, सांघिक कार्य, समाजाभिमुख चिंतन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे संस्कार होतात. या प्रशिक्षित स्वयंसेवकांनी आता समाजात देशभक्ती रुजवत, ‘पंच परिवर्तना’च्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनासाठी समाजाला सोबत घेऊन काम करावे.” लातूरचा भूकंप असो की कोरोना महामारीचा काळ, संघाच्या याच प्रशिक्षणामुळे स्वयंसेवकांनी नेहमीच आघाडीवर राहून सेवाकार्य केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

– १५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण

वर्ग कार्यवाह आमोद कालगावकर यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा हा संघ शिक्षा वर्ग १५ दिवसांचा असून, यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांचे ७५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. १९ जून ते ५ जुलै या कालावधीत चालणाऱ्या या वर्गात शारीरिक, बौद्धिक आणि कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबवले जातील. यात प्रामुख्याने संस्कृत संभाषण, ‘गीता फॉर यूथ’, प्रकल्प अहवाल तयार करणे, पर्यावरण आणि नागरी शिष्टाचार याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वर्गासाठी २५ पूर्णवेळ शिक्षक आणि व्यवस्था विभागाचे १० कार्यकर्ते कार्यरत आहेत. ४ जुलै रोजी संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत या वर्गाचा समारोप होईल.

 

– स्वाध्याय देवभक्ती, तर संघ देशभक्ती शिकवतो!

डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘स्वाध्याय परिवारा’चे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी संघाच्या कार्यपद्धतीचा गौरव केला होता, अशी आठवण करपे यांनी या वेळी सांगितली. “स्वाध्याय परिवार समाजाला देवभक्ती शिकवतो, तर संघ समाजाला देशभक्ती शिकवतो,” असे उद्गार आठवले यांनी काढल्याचे त्यांनी नमूद केले.

 

– ‘विकसित भारत २०४७’चे ध्येय

“भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाला आता २१ वर्षे बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवकांनी शाखेच्या माध्यमातून कार्यकर्ता निर्मितीसोबतच समाज परिवर्तनाचे ठोस कार्य हाती घ्यावे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्व-बोध, नागरी कर्तव्ये आणि पर्यावरण संवर्धन हे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवावेत,” असे आवाहनही करपे यांनी शेवटी केले.

—————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments