Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedहवा गुणवत्ता व्यवस्थापनासाठी आधुनिक डिसिजन सपोर्ट सिस्टिम

हवा गुणवत्ता व्यवस्थापनासाठी आधुनिक डिसिजन सपोर्ट सिस्टिम

 

 

पुणे, 23 जून 2026: सीआयआय क्लीनर एअर बेटर लाईफ (सीएबीएल) तर्फे व पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ हवेसाठी एक बहुभागधारक बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ,सीआयआय क्लीनर एअर बेटर लाईफ उपक्रमाच्या अध्यक्ष श्वेता आर्या आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी सीएबीएल फोरम तर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी डिसिजन सपोर्ट सिस्टिम (डीएसएस) या अभिनव प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. हा अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म असून डेटा-आधारित हवेच्या गुणवत्ता व्यवस्थापनासाठी व निर्णय प्रक्रिया सक्षम करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे शहर प्रशासनाला हवेच्या गुणवत्तेशी संबंधित माहिती अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असून त्याचे विश्लेषण आणि वापर करणे सुलभ होईल. त्यामुळे अधिक प्रदूषित भाग ओळखणे (पोल्युशन्स हॉटस्पॉटस्‌‍), विविध उपाय योजनांचे मूल्यांकन करण्यास तसेच नियोजन आणि अमंलबजावणी प्रक्रिया अधिक बळकट करण्यास मदत होईल.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी ही डिसीजन सपोर्ट सिस्टिम (डीएसएस) एअरव्हॉइस तर्फे विकसित केली गेली आहे. ही प्रणाली 72 तास आधीपर्यंतच्या हवेच्या गुणवत्तेचा उच्च-रिझ्योल्युशन अंदाज प्रदान करेल.स्थानिक उत्सर्जन नोंदी,सविस्तर हवामान अंदाज आणि आधुनिक ॲटमॉसफेरिक मॉडेलिंगच्या आधारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली संपूर्ण परिसरासाठी 1 किमी रिझोल्युशनवर तासागणिक हवेच्या गुणवत्तेचे अंदाज तयार करते.प्रदूषणाच्या पातळीचा दूरदृष्टीपूर्ण आढावा देेऊन ही प्रणाली शहर प्रशासनाला प्रदूषणाच्या घटनांचा अंदाज घेण्यास,वेळेवर उपाययोजना आखण्यास, हवेच्या गुणवत्तेतील नवीन समस्यांचा अभ्यास करण्यास आणि सातत्याने प्रदूषित राहणाऱ्या भागांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.यामुळे दोन्ही शहरांमध्ये सक्रिय,नियोजनबध्द आणि डेटा आधारित हवा गुणवत्ता व्यवस्थापनाला बळ मिळेल.जशी शहरे वाढत जातील आणि हवेच्या गुणवत्तेबाबतो आव्हान अधिक गुंतागुंतीचे होत जाईल,तसतसे डेटा आधारित नियोजन आणि सहयोगात्मक कृती अधिक महत्त्वपूर्ण ठरेल.

 

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या क्लीनर एअर बेटर लाईफ (सीएबीएल) उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत विविध भागधारकांना आपला दृष्टिकोन मांडण्यासाठी आणि स्वच्छ हवा व निरोगी शहरी पर्यावरणाच्या दिशेने कृती आराखडा तयार करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून झाले. सीएबीएल हा सीआयआयने नीती आयोगाच्या सहकार्याने सुरू केलेला व उद्योगांच्या नेतृत्वाखालील प्रमुख उपक्रम आहे. सहयोगात्मक आणि पुराव्यांवर आधारित कृतीद्वारे हवा प्रदूषणाच्या समस्येचा सामना करणे आणि देशभरातील शहरी पर्यावरणीय प्रशासन अधिक सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे.

 

श्वेता आर्या म्हणाल्या की,2016 मध्ये क्लीन एअर, बेटर लाइफ उपक्रम सुरू केल्यापासून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यावहारिक आणि मोठया प्रमाणावर राबवता येतील असे उपाय विकसित करण्याच्या उद्देशाने उद्योग, शासन, संशोधक, शिक्षणतज्ञ आणि नागरिक यांना एकत्र आणण्यावर सीआयआयने भर दिला आहे. आधीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे सीआयआयने 2023 मध्ये पुण्यात क्लीन एअर, बेटर लाइफ उपक्रम सुरू केला. आज आम्ही बहु-भागधारक क्लीन एअर फोरम या कार्यक्रमाच्या आयोजनाद्वारे सीएबीएल ॲक्शन लॅब येथे पुरावे आधारित तयार करण्यात आलेला कृती आढाव्याच्या माध्यमातून पुढचे पाऊल उचलत असून यामध्ये विविध भागधारक आपले मत मांडून योगदान देऊ शकतात.

 

या बैठकीत आयोजित एका गोलमेज चर्चेदरम्यान सीएबीएल कृती योजनेच्या मसुद्याचा आढावा घेण्यात आला.या चर्चेत प्राधान्यक्रमाच्या उपाययोजना ओळखणे,भागधारकांमधील समन्वय वाढवणे आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सामायिक आराखडा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.या बैठकीत उद्योग,शिक्षण,प्रशासन यातील प्रतिनिधींबरोबरच स्थानिक स्टार्टअप्स आणि संस्थांनी सहभाग घेत नाविन्यपूर्ण उपायांसाठी त्यांच्या कल्पना मांडल्या.

 

 

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व क्लीन एअर फोरमचे सह-संयोजक नवल किशोर राम म्हणाले, स्वच्छ हवा हे केवळ स्वतंत्र उद्दिष्ट नसून शहराचे नियोजन, विकास आणि शाश्वततेचे प्रतिबिंब आहे. तिचा पाणी व्यवस्थापन, हरित क्षेत्र, नागरी पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या जीवनमानाशी जवळचा संबंध आहे. पुणे शहराचा विस्तार आणि विकास होत असताना पर्यावरणीय शाश्वतता आणि विकास यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुण्याला अनेक उत्कृष्ट संस्था आणि तज्ज्ञांचे बळ लाभले असून त्यांच्या सहकार्याने माहिती-आधारित आणि परिणामकारक उपाययोजना विकसित करता येतील. प्रगत हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण प्रणाली, कमी उत्सर्जन क्षेत्रे, हरित क्षेत्राचा विस्तार आणि विविध भागधारकांमधील समन्वयात्मक कृती यांच्या माध्यमातून पुण्याला अधिक निरोगी, स्वच्छ आणि शाश्वत नागरी भविष्य घडविण्याची मोठी संधी आहे.

 

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, पुण्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्रित आणि सहयोगात्मक प्रयत्नांची गरज आहे. शहरासमोरील आव्हाने लक्षात घेता शाश्वत वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक परिवहनाची अधिक मजबुती आणि प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन या बाबी स्वच्छ हवा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. तज्ज्ञ आणि विविध भागधारकांचे ज्ञान व अनुभव या प्रक्रियेत अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रशासन सर्वांसोबत समन्वय साधून व्यवहार्य उपाययोजना राबविण्यास कटिबद्ध आहे. दीर्घकालीन उपाययोजनांसोबतच अल्पकालीन आणि तातडीने अंमलात आणता येतील अशा उपक्रमांवर भर देणे आवश्यक आहे. नियमित आढावा आणि सातत्यपूर्ण निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्या योजनांचे प्रत्यक्ष परिणाम शहराच्या हवेच्या गुणवत्तेत दिसून यावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

 

कार्यक्रमाची सुरुवात सीआयआयचे कार्यकारी संचालक शिखर जैन यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. कार्यक्रमाचा समारोप कमिन्स इंडियाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी आशिष अग्रवाल यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

 

 

क्लीनर एअर बेटर लाईफ (सीएबीएल) उपक्रमाविषयी

 

क्लीनर एअर बेटर लाईफ (सीएबीएल) हा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उद्योग-नेतृत्वाखालील प्रमुख उपक्रम आहे. सहयोगात्मक आणि पुराव्यांवर आधारित कृतीद्वारे हवा प्रदूषणाच्या आव्हानाला सामोरे जाणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत उपाययोजना विकसित शासन, उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि समाज यांना एकत्र आणून नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि हवेची गुणवत्ता सुधारणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

 

सीएबीएल हा उपक्रम शहरांना हवेच्या गुणवत्ता व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण आणि डेटा-आधारित उपाय योजनांचे नियोजन करण्यास मदत करतो. तसेच क्षमता वाढविणे आणि सहकार्यात्मक प्रशासनाला चालना देणे यासाठीही तो कार्यरत आहे. विविध भागधारकांचा सहभाग, तांत्रिक सहाय्य, ज्ञानाचे आदान-प्रदान आणि धोरणात्मक पाठपुरावा यांच्या माध्यमातून हा उपक्रम भारतातील शहरांमध्ये अधिक निरोगी, सक्षम आणि शाश्वत शहरी पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीला

गती देण्याचे कार्य करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments