पुणे, दि. २९ : जिल्ह्यात २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान ज्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देता आले नाहीत, अशा सर्व बालकांचे पुढील तीन दिवस आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
यावेळी त्यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, आरोग्य विभागाचे कर्मचारी पुढील तीन दिवस घराघरात भेट देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजणार आहेत. त्यामुळे पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.
“एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे नमूद करत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून “पोलिओमुक्त पुणे – निरोगी पुणे” घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


