पुणे, दि. ३० : खरीप हंगाम २०२६-२७ साठी राज्य शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तूर व मुग पिकांच्या मिनीकिट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग यांनी केले आहे.
खरीप हंगामाच्या तयारीचा भाग म्हणून या योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर तूर व मुग पिकासाठी ०.२० हेक्टर क्षेत्राकरिता ४ किलो बियाण्यांचे मिनीकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रति शेतकरी जास्तीत जास्त १ एकर क्षेत्रापर्यंत बियाण्यांचे मिनीकिट वितरित करण्यात येईल. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक असून अर्जदाराकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुढील दोन वर्षे या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पुणे विभागातील मिनीकिट अर्जांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे :
जिल्हा
*पहिली आकडेवारी मिनीकिट लक्षांकची दुसरी
प्राप्त अर्जाची आहे*
*अहिल्यानगर*
७,३००
३,९३४
*पुणे*
१,०००
५१६
*सोलापूर*
६,०००
१,२३३
*पुणे विभाग एकूण*
१४,३००
५,६८३
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याने या योजनेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे महिला शेतकरी खातेदारांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर, पुणे व सोलापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


