पुणे -आपत्कालीन यंत्रणा सक्षम करणेबाबत / जेटिंग मशीन, पंप व अन्य मशीनरी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.दोन तीन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मी नगरसेविका असलेल्या प्रभाग क्रं २९ ( डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलोनी ) येथे अनेक सोसायटीत, वस्त्यांमध्ये व रस्त्यावर पाणी साचले आहे. काही सोसायटीत तर कमरे एवढे पाणी असून ह्या सर्व ठिकाणी यंत्रांच्या कमतरतेमुळे मदत करण्यात अडचणी येत आहेत.एकेका ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी काही तासांचा अवधी लागत असून दुसऱ्या ठिकाणी कामगार व यंत्र पोहोचेपर्यंत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तरी ह्या पत्राद्वारे मी आपणास विनंती करते की पावसाळ्याच्या काळात अधिकच्या जेटिंग मशीन, पंप व मनुष्य बळाची त्वरित व्यवस्था करावी व नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच ह्या सर्व ठिकाणी पुन्हा पाणी साचू नये यासाठी दीर्घाकालीन उपाययोजनेच्या दृष्टीने तांत्रिक तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांची मदत घेऊन आराखडा तयार करावा व त्वरित त्याची अंमलबजावणी करावी.
यासह माझा प्रभाग हा हरित प्रभाग असल्यामुळे येथे झाड पडीच्या घटना ही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अग्निशमन दलाचे जवान तातडीने कार्यवाही करून रस्ते मोकळे करतात मात्र त्यानंतर खोड,फ़ांद्या व कचरा जागेवरून हलविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करावी अशीही मागणी करत आहे.


