Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorized*पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर आळंदी नगर परिषदेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम- मुख्याधिकारी माधव खांडेकर*

*पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर आळंदी नगर परिषदेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम- मुख्याधिकारी माधव खांडेकर*

 

 

पुणे, दि. 9: संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर तसेच पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर आळंदी नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतूकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे.

 

पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वारकऱ्यांची मोठी गर्दी लक्षात घेऊन नगर परिषदेमार्फत मध्यरात्रीच्या वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे सातत्याने करण्यात आली. ज्या ठिकाणी दिंड्या मुक्कामी होत्या, जर्मन हँगर उभारण्यात आले होते तसेच मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती, त्या सर्व ठिकाणांची तात्काळ स्वच्छता करून परिसर पूर्ववत करण्यात आला आहे.

 

सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम सुरू असून, अलीकडील पूरपरिस्थितीमुळे घाट परिसरात व नदीकाठावर साचलेला गाळ, कचरा व जलपर्णी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी सुमारे ४०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जेसीबीच्या सहाय्याने घाट परिसरातील जलपर्णी व गाळ हटविण्याचे काम सुरू आहे.

 

यासोबतच शहरात निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक औषधे व बीएचसी (पावडर फवारण्यात येत असून, दुर्गंधी दूर करण्यासाठी आवश्यक औषधांचीही फवारणी करण्यात येत आहे. रस्त्यांवर साचलेला गाळ व कचरा हटवून अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सहाय्याने रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात येत आहेत.

 

पूरामुळे अनेक दुकाने व व्यावसायिक आस्थापनांमध्ये गाळ साचला होता. अशा ठिकाणीही नगर परिषदेमार्फत स्वच्छता करण्यात येत असून, दुर्गंधी दूर करण्यासाठी ओडोफ्रेशसह आवश्यक औषधांची फवारणी केली जात आहे. शहरातील सर्व प्रकारचा कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू आहे.

 

विशेष म्हणजे, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचा मार्ग पूर्णपणे स्वच्छ, सुरक्षित व अडथळामुक्त राहावा यासाठी संपूर्ण पालखी मार्ग रातोरात स्वच्छ करण्यात आला. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता व सार्वजनिक सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत आळंदी नगर परिषद सर्व आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहे.

 

सर्व स्वच्छता, कचरा संकलन, निर्जंतुकीकरण व पूरपश्चात पुनर्स्थापना कामे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच स्वच्छता निरीक्षक दत्ता गायकवाड यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व देखरेखीखाली युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आळंदी नगर परिषदेमार्फत सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने आवश्यक ती कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे, अशी माहिती श्री. खांडेकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments