Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedशब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार! गीतांच्या निर्मिती मागील आठवणी,...

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार! गीतांच्या निर्मिती मागील आठवणी, रंजक किस्से आणि सुरेल सादरीकरणाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भारावले

पिंपरी, दि. ४ ऑक्टोबर २०२६ – शब्दांमधील भाव जाणून घेत त्यांना स्वरांची साथ देत जन्माला आलेली गाणी आणि त्या गीतांच्या निर्मितीमागच्या असंख्य आठवणी… कधी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या स्वरांची आठवण, तर कधी आशा भोसले यांच्या गायकीचा संदर्भ, कधी शांता शेळके आणि सुरेश भट यांच्या शब्दांमागच्या कथा… अशा शब्द-सूर-आठवणींच्या त्रिवेणीने पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ ही मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.

 

अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा सांगीतिक कार्यक्रम झाला.

 

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांनी संपूर्ण प्रेक्षागृह सुरांनी भारून गेले. ‘माझ्या सारंगा’, ‘गोमू माझ्या तू संगतीने’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धरला तू माझा हात’, ‘मी डोलकर डोलकर’, ‘डोलकर दर्याचा राजा’, ‘घर पाण्यावरी’, ‘बंदराला करतो ये-जा’, ‘माझे रानी, माझे मोगा’, ‘तुजे डोळ्यांत शोधता ठाव’ आणि ‘मोगरा फुलला’ अशा एकाहून एक लोकप्रिय गीतांनी रसिकांना सुरांच्या भावविश्वात चिंब भिजवले.

 

या गीतांचे सादरीकरण हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरलेच; मात्र त्यामागील कथा आणि आठवणींनी कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली.

 

एखाद्या गीताची रचना कशी सुचली, शब्दांमधील भाव ओळखून त्याला चाल कशी लाभली, संगीतबद्ध करताना कोणते प्रसंग घडले, अशा अनेक आठवणी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांशी संवाद साधत उलगडल्या. त्यामुळे ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना त्यामागील भावविश्व जाणून घेण्याची नवी दृष्टी रसिकांना मिळाली.

 

….

 

 

 

लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या आठवणींसह शांता शेळके, सुरेश भट यांच्या गीतनिर्मितीचा रंजक प्रवास:

 

ज्येष्ठ गायिका भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासोबतच्या सांगीतिक प्रवासातील आठवणी सांगताना पं. हृदयनाथ मंगेशकर भावुक झाले. दोन्ही बहिणींसोबत काम करतानाचे अनुभव, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून ते गाण्याच्या सादरीकरणापर्यंतचे अनेक किस्से त्यांनी रसिकांसमोर मांडले. कवयित्री शांता शेळके आणि गझलकार सुरेश भट यांच्या शब्दांमागील भावविश्व उलगडताना गीतनिर्मितीच्या प्रक्रियेतील अनेक रंजक प्रसंगही त्यांनी सांगितले.

 

‘अभिजात मराठी’ ही केवळ भाषेची संकल्पना नसून शब्द, आशय, काव्य आणि संगीत यांच्या समृद्ध परंपरेचा अनुभव आहे, याची प्रचिती या मैफलीतून आली. मराठीतील अभिजात शब्दवैभवाला अभिजात संगीताची जोड देत सादर झालेल्या गीतांनी रसिकांच्या मनात भावनांचे अनेक पदर उलगडले. शब्दांचा अर्थ, त्यातील सूक्ष्म भाव आणि स्वरांची ताकद यांचा सुरेख मिलाफ या मैफलीत अनुभवायला मिळाला.

 

गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी आपल्या भावपूर्ण गायकीने या गीतांना सुरेल साज चढवला. त्यांच्या स्वरांनी ‘माझ्या सारंगा’पासून ‘मोगरा फुलला’पर्यंत प्रत्येक गीताचे भावविश्व जिवंत केले. प्रत्येक सादरीकरणानंतर रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद मैफलीची रंगत वाढवत होती.

 

तबला साथ डॉ. राजेंद्र दुरकर आणि विक्रम भट, रिदमवर अजय अत्रे, बासरीवर अमर ओक, सिंथेसायझरवर दर्शना जोग यांनी केली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केले.

 

 

 

या कार्यक्रमाला भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांची देखील

विशेष उपस्थिती होती.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments