Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorized*'विठू माऊली' कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजर* *आषाढी वारीच्या...

*’विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजर* *आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात १० जुलै रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार हरिनामाचा सांगीतिक सोहळा*

 

 

*पुणे* , दि. १० जुलै : महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील भक्ती, अध्यात्म आणि सांगीतिक वारशाचा जागर करणारा ‘विठू माऊली – गजर हरीनामाचा, सोहळा विठुरायाचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, थं क्रिएटिव्ह, पर्यावरण दक्षता कृती मंच (निसर्गवारी) आणि सुरांजली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

 

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विठ्ठलभक्ती, हरिनाम संकीर्तन आणि अभंग परंपरेचा सांगीतिक उत्सव रसिकांना अनुभवता येणार आहे. संतपरंपरेतील भक्तिरसाने नटलेली गीते, अभंग आणि हरिनामाचा गजर यांद्वारे विठुरायावरील अखंड श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक परंपरा प्रभावीपणे साकारण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात वारकरी संप्रदायाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी अभंग, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता, मानवता आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख समृद्ध केली असून, त्याच संतपरंपरेचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

 

‘विठू माऊली’ हा कार्यक्रम केवळ भक्तिसंगीताचा आस्वाद देणारा नसून, महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी नव्या पिढीला जोडणारा उपक्रम आहे. भक्ती, संस्कृती आणि संगीत यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमातून वारकरी संप्रदायाची जीवनमूल्ये, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 

सदर कार्यक्रम मा. अॅड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच मा. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे तसेच संतपरंपरेतील मूल्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

 

या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, थं क्रिएटिव्ह, पर्यावरण दक्षता कृती मंच (निसर्गवारी) आणि सुरांजली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरा आणि भक्तिसंगीताचा समृद्ध वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच अध्यात्म, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जनमानसात अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी, वारकरी, कला रसिक तसेच नागरिकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments