Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized*वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाकडे दुर्लक्ष करू नका; ही असू...

*वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाकडे दुर्लक्ष करू नका; ही असू शकतात पित्ताशयातील खड्यांची लक्षणे* *लठ्ठपणा, असंतुलित आहार, मधुमेह आणि बैठी जीवनशैली ठरतेय कारणीभूत*

*दर महिन्याला ३० ते ७० वयोगटातील सुमारे ५० टक्के रुग्ण पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येतात*

पुणे : हल्ली पित्ताशयात खडे (गॉलस्टोन्स) होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक रुग्ण तीव्र पोटदुखी किंवा इतर गंभीर गुंतागुंत आढळून आल्यानंतरच डॉक्टरांकडे धाव घेतात येतात. संतुलित आहाराचा अभाव, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, झपाट्याने वजन कमी होणे, मधुमेह आणि वाढते वय ही पित्ताशयात खडे होण्यामागची प्रमुख कारणं आहेत. वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे किंवा अपचन यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत तसेच आपत्कालीन शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पित्ताशयात तयार होणारे कोलेस्ट्रॅाल, पित्तद्रव्ये आणि कॅल्शियमपासून खडे तयार होतात. बऱ्याचदा याची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. मात्र जेव्हा यामुळे पित्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊ लागतो किंवा पित्ताशयाला सूज येते तेव्हा ही गंभीर समस्या उद्भवू शकते.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे येथील जनरल सर्जन डॉ. नितीन भावे म्हणाले की, तेलकट किंवा पचायला जड अशा अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूस वरच्या भागात वेदना होऊ लागतात हे पित्ताशयातील खड्यांचे महत्त्वाचे लक्षण आहे. ही वेदना पाठीत किंवा उजव्या खांद्यापर्यंत वाढु शकते आणि ती काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत टिकून राहू शकते. याशिवाय पोट फुगणे, मळमळ, उलट्या, अपचन किंवा जेवल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे अशी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं अनेकदा अॅसिडिटी किंवा सामान्य पचनाच्या तक्रारी समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

डॉ भावे पुढे म्हणाले की, पित्ताशयात खडे असलेल्या जवळपास ५० टक्के रुग्णांकडून सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. दर महिन्याला ३० ते ७० वयोगटातील सुमारे ५० टक्के रुग्ण वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाच्या तक्रारींसह आमच्याकडे उपचारांसाठी येतात. लक्षणे सुरू झाल्यानंतरही उपचार न घेतल्यास पित्ताशयाला सूज येणे (कोलेसिस्टायटिस), संसर्ग, पित्तवाहिनीतील अडथळा, कावीळ, स्वादुपिंडास सूज (पॅन्क्रियाटायटिस) किंवा पोटाचा गंभीर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे वारंवार पोटदुखी होत असल्यास किंवा त्यासोबत ताप, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे, सतत उलट्या होणे किंवा तीव्र पोटदुखी अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पित्ताशयातील खड्यांचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड ही सर्वात प्रभावी आणि प्राथमिक तपासणी आहे.

डॉ. भावे पुढे म्हणाले की, लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम उपचार मानला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर लहान छिद्र केले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी तमी कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो. वजन नियंत्रित राखणे, फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे, तेलकट पदार्थांचे अतिसेवन टाळणे, नियमित व्यायाम करणे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणे यामुळे गॉलस्टोन्सचा धोका कमी होऊ शकतो. मधुमेही आणि तरुणांमध्ये गुंतागुंतीची शक्यता अधिक असल्याने त्यांना लक्षणं नसली तरी काही वेळा शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. पित्ताशयाला सूज येण्यापूर्वी शस्त्रक्रिया केल्यास ती अधिक सोपी होते आणि रुग्ण लवकर बरा होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments