Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत फोर्ज आणि फ्लाइंग व्हेल्स यांच्यामध्ये भारतातील संरक्षण, सामरिक आणि राष्ट्रीय सुरक्षाविषयक...

भारत फोर्ज आणि फ्लाइंग व्हेल्स यांच्यामध्ये भारतातील संरक्षण, सामरिक आणि राष्ट्रीय सुरक्षाविषयक वापराकरता हेवी-लिफ्ट एअरशिपच्या विकास व उत्पादनासाठी धोरणात्मक सामंजस्य करार

संरक्षण, सामरिक रसद व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा मोहिमांसाठी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत अत्याधुनिक एअरशिपचे उत्पादन करण्यासाठी भागीदारी –

फार्नबरो, 22 जुलै 2026: भारत फोर्ज लिमिटेडने आपल्या एरोस्पेस विभागामार्फत हेवी-लिफ्ट एअरशिप तंत्रज्ञानातील फ्रान्स-कॅनडास्थित जागतिक अग्रणी कंपनी फ्लाइंग व्हेल्ससोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. भारताच्या संरक्षण आणि सामरिक कार्यात्मक गरजांसाठी प्रगत एअरशिपचा संयुक्तपणे विकास, उत्पादन आणि ती कार्यान्वित करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारत फोर्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (एरोस्पेस) श्री. गुरू बिस्वाल आणि फ्लाइंग व्हेल्सचे अध्यक्ष श्री. सेबॅस्टियन बुगॉन यांनी फार्नबरो इंटरनॅशनल एअरशो 2026 मध्ये या करारावर स्वाक्षरी केली.

ही भागीदारी भारतात स्वदेशी एअरशिप परिसंस्था उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांशी सुसंगत आहे. संरक्षण क्षेत्रातील वापरासाठी फ्लाइंग व्हेल्स–भारत फोर्ज एअरशिपचे उत्पादन, एकत्रीकरण आणि निर्मिती भारतातच सुरु करण्यासाठी दोन्ही कंपन्या संयुक्तपणे काम करणार असून सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या एरोस्पेस क्षेत्रात देशासाठी स्वयंपूर्ण क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

या सहकार्याचा केंद्रबिंदू म्हणजे LCA60T हा फ्लाइंग व्हेल्सचा अत्याधुनिक हेवी-लिफ्ट एअरशिप प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म 60 टनांपर्यंत मालवाहतूक करण्यास सक्षम असून, उभ्या पद्धतीने उड्डाण आणि लँडिंग, जमिनीवरील पायाभूत सुविधांची अत्यल्प आवश्यकता आणि हायब्रिड-इलेक्ट्रिक प्रणोदन प्रणाली यांसारखी वैशिष्ट्ये त्यामध्ये आहेत. कठीण, आव्हानात्मक आणि दुर्गम भागांमध्ये थेट एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कार्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममुळे लष्करी पुरवठा व वाहतूक व्यवस्था, सामरिक गतिशीलता आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

या भागीदारीअंतर्गत संरक्षण क्षेत्रातील विविध वापराच्या शक्यतांचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये आघाडीवरील कार्यरत तळांना लॉजिस्टिक सहाय्य, मोठ्या आकाराच्या उपकरणांची आणि महत्त्वाच्या लष्करी पुरवठ्याची वाहतूक, गुप्तचर यंत्रणा, देखरेख आणि टेहळणी मोहिमा, कम्युनिकेशन रिले प्रणाली, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य तसेच दुर्गम सीमावर्ती भाग आणि कठीण, आव्हानात्मक भूप्रदेशात जलद तैनात यांचा समावेश आहे.

भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित कल्याणी म्हणाले, “एअरशिपमुळे राष्ट्रे त्यांच्या संरक्षण दलांची हालचाल कशी करतात, पुरवठा कसा होतो आणि कार्यसातत्य राखण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होईल आणि या परिवर्तनाचे नेतृत्व भारत करेल. या धोरणात्मक भागीदारीमुळे हेवी-लिफ्ट एअरशिपचे डिझाइन, उत्पादन आणि कार्यान्वयन करण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या समूहात भारताचा समावेश होणार आहे. फ्लाइंग व्हेल्सचे अग्रगण्य तंत्रज्ञान आणि भारत फोर्जचा सहा दशकांचा प्रगत अभियांत्रिकी अनुभव तसेच भारताच्या संरक्षण गरजांची सखोल जाण या भागीदारीत एकत्र आले आहे. आत्मनिर्भर भारतच्या भावनेशी सुसंगतपणे आम्ही देशासाठी स्वयंपूर्ण क्षमता, नवीन औद्योगिक परिसंस्था आणि सामरिक गतिशीलतेचे पूर्णपणे नवे परिमाण निर्माण करत आहोत.”

फ्लाइंग व्हेल्स सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. टँगाय लेस्तिएन म्हणाले, “जगातील सर्वाधिक दुर्गम आणि आव्हानात्मक ठिकाणी पोहोचण्याच्या उद्देशाने LCA60Tची संकल्पना विकसित करण्यात आली आणि भारतासारख्या विशाल भौगोलिक विस्तार, आव्हानात्मक भूप्रदेश आणि विलक्षण महत्त्वाकांक्षा असलेल्या देशात तिची क्षमता सर्वोत्तम प्रकारे साकार होईल. भारत फोर्जसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचे सखोल अभियांत्रिकी कौशल्य, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञता आणि समान दृष्टीकोन यामुळे हा कार्यक्रम व्यापक स्तरावर नेण्यासाठी ही एक खऱ्या अर्थाने धोरणात्मक युती ठरते. आम्ही एकत्रितपणे भारतात, भारतासाठी आणि जगासाठी उत्पादन करू आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सेवा देणाऱ्या एअरशिप उद्योगाची भक्कम पायाभरणी करू.”

प्रस्तावित स्थानिकीकरण कार्यक्रमामुळे उच्च तंत्रज्ञानाधारित रोजगारनिर्मिती होण्याची, प्रगत पुरवठा साखळी विकसित होण्याची आणि भविष्यात निर्यातीच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे जागतिक एरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments