पुणे : ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे शहरातील सर्व ढोल-ताशा पथकांच्या प्रतिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. विविध गणपती मंडळांचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते या पारंपरिक वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट चे नितीन पंडित, भाऊसाहेब रंगारी मंडळ ट्रस्ट चे पुनीत बालन , सरस्वती कराड हॉस्पिटलचे शिरीष भातलवंडे, जिलब्या गणपती सार्व मंडळ ट्रस्ट चे भूषण पंड्या तसेच ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, ॲड शिरीष थिटे, अक्षय बलकवडे, विलास शिगवण, अभिजीत कुमावत, प्रशांत तांबे, ओंकार कलढोणकर, अमर भालेराव
आदी उपस्थित होते.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून भाविक आणि पर्यटक येतात. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुयोग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी पुणे महानगरपालिकेसह विविध संघटनांकडून करण्यात येणारी कामे एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पराग ठाकूर म्हणाले, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला उशीर झाला की त्याचे खापर अनेकदा ढोल-ताशा पथकांवर फोडले जाते. प्रत्यक्षात गणेशोत्सवाला शिस्तबद्ध स्वरूप देण्याचे मोठे काम ढोल-ताशा पथकांनी केले आहे. वादक हे आपल्या वादनातून श्रीगणेशाची सेवा आणि पूजा करतात. उत्सवामध्ये रंगत आणण्याचे काम ही वाद्यपथके करतात. सुमारे १५० दिवस सराव करून, आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून वादक गणेशसेवा करतात. असे असतानाही वादक आणि पथकांकडे कायम नकारात्मक दृष्टीने का पाहिले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वादकांच्या मागे कोणीतरी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.


