पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे आयोजित दोन दिवसीय उपशास्त्रीय संगीत कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उपशास्त्रीय संगीताचे विविध प्रकार शिकत त्यामागील सौंदर्य, बारकावे आणि वैशिष्ट्ये अनुभवली. ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक तसेच संगीत नाटक अकादमी, उत्तर प्रदेशचे अध्यक्ष पं. जयंत खोत यांनी विद्यार्थ्यांना उपशास्त्रीय संगीताचे सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. संगीत विभागप्रमुख डॉ. प्रवीण कासलीकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गुरु विदुषी अंजली मालकर, गायक अंगद गायकवाड तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळेत पं. खोत यांनी ग्वाल्हेर घराण्यातील टप्पा, टपख्याल, त्रिवट, चतरंग, अष्टपदी आदी उपशास्त्रीय गायनप्रकारांची माहिती देत त्यांचे सादरीकरण आणि वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. प्रत्येक गायनप्रकार त्याचे वैशिष्ट्य जपत प्रभावीपणे कसा सादर करावा, याचे त्यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
टप्पा गायनाचे प्रशिक्षण देताना त्यांनी यमन आणि बिहाग रागांतील टपख्याल शिकविले. त्यानंतर खमाज, काफी, तिलंग, झिंजोटी आदी रागांतील तसेच विविध तालांतील टप्प्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला. दुसऱ्या दिवशी ग्वाल्हेर घराण्याचे वैशिष्ट्य असलेल्या अष्टपदीपासून सत्राची सुरुवात झाली. विविध रागांतील अष्टपदी, चतरंग आणि रास या गायनप्रकारांचेही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या कार्यशाळेमुळे संगीत आणि नृत्य विभागातील विद्यार्थ्यांना उपशास्त्रीय संगीताचे सौंदर्य, भावाभिव्यक्ती, शब्दोच्चार आणि स्वरफेक यांचा सखोल परिचय झाला. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


