पुणे, दि. १४ : माती व पाण्याचे संवर्धन, जलसंधारणाबाबत जनजागृती तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी दि. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि दि. १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात विविध जनजागृती व क्षेत्रीय उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज बैठक घेऊन संबंधित विभागांना सूचना दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक थेंबाचे जतन करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. याच अनुषंगाने
दि. २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने त्या दिवशी
सकाळी ६ ते ९ या दरम्यान ‘महा पदयात्रा – पाण्यासाठी’ पोलिस परेड ग्राउंड, शिवाजीनगर,पुणे येथून काढण्यात येणार आहे.
.
‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ ही या पदयात्रेची संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे. युवक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच जलसंधारण क्षेत्रात कार्यरत घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे.
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, भित्तिपत्रक, वादविवाद आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘एक शाळा – एक शोषखड्डा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत त्यांचा ‘जलमित्र’ व ‘जलदूत’ म्हणून सहभाग वाढविण्यात येणार आहे.
युवकांपर्यंत जलसंधारणाचा संदेश आधुनिक माध्यमातून पोहोचविण्यासाठी ‘माती आणि जलसंधारण जनजागृती चित्रफीत’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण तसेच जलसंधारणाच्या यशस्वी कामांवर आधारित सर्जनशील चित्रफीत तयार करण्यास युवकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या कालावधीत जलसंधारणाच्या कामांचे भूमीपूजन, लोकार्पण व जलपूजन, अमृत सरोवरांना भेट, वृक्षारोपण, जलस्रोतांची स्वच्छता तसेच शेततळे, शेतबंधारे, सलग समतल चर, खोल सलग समतल चर आदी कामांची पाहणी करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयातून हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.
जलसंधारणाला केवळ शासकीय कार्यक्रम न ठेवता त्याला लोकचळवळीचे स्वरूप देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ‘पाणी वाचवा, भविष्यासाठी पाणी जपा’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.


