Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedअन्न व औषध प्रशासनाची हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स व डेअरी आस्थापनांवर धडक कारवाई;...

अन्न व औषध प्रशासनाची हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स व डेअरी आस्थापनांवर धडक कारवाई; १६ आस्थापनांचे परवाने/नोंदणी निलंबित*

*शाळांच्या ५० मीटर परिसरात एचएफएसएस पदार्थ विक्री करणाऱ्यांवर सोमवारपासून कारवाई*

पुणे, दि. १४ : अन्न सुरक्षा, स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबविली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात दि. ११ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानकांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्याने १६ आस्थापनांचे परवाने/नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

या कारवाईत हॉटेल व रेस्टॉरंट विभागातील फॉर्च्यून एंटरप्रायझेस (हॉटेल सयाजी), लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे; हॉटेल चूल मटण, नगर रोड, जकात नाका, खांदवे नगर, लोहेगाव, पुणे; सिम्पली साऊथ, जय महाराष्ट्र चौक, भोसरी, पुणे; हॉटेल पवन, सरदारलश्कर पार्क, इंदुमती रोड, ताराबाई पार्क, कोल्हापूर; राजेश चायनीज, पंचमुखी मारुती रोड, सांगली; जेबीएम हॉस्पिटॅलिटी (कॅन्टीन), एचडीएफसी बँक, गोल्डन ईस्ट, वानवडी, पुणे; बर्गर किंग, ईस्ट स्ट्रीट, सोलापूर बाजार, कॅम्प, पुणे; डॉमिनोज पिझ्झा, ज्युबिलंट फूड्स वर्क्स लिमिटेड, मलकापूर, कराड, सातारा आणि पिझ्झा हट, सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेड, कराड, सातारा या आस्थापनांचा समावेश आहे. यापैकी जेबीएम हॉस्पिटॅलिटी (कॅन्टीन) ही आस्थापना विना परवाना व्यवसाय करत असल्याचे आढळल्याने व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ई-कॉमर्स आस्थापनांमध्ये झेप्टो लिमिटेड, सर्व्हे क्रमांक २८१, संस्कृती हॉटेलजवळ, लंबोदर खाऊ गल्ली, पोर्वाल रोड, लोहेगाव, पुणे; स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड, वारजे जकात नाका, कर्वेनगर, पुणे; ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, नर्‍हे, सिंहगड रोड, पुणे आणि ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, टिंबर मार्केट, भवानी पेठ, पुणे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

डेअरी आस्थापनांमध्ये ओम साई राम मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, रेटवडी, ता. खेड, जि. पुणे; धर्मनाथ दूध शीतकरण केंद्र, मु. पो. लोणी, ता. आंबेगाव, जि. पुणे आणि आर. के. मिल्क, कांचनवाडी, आंधोरी, ता. खंडाळा, जि. सातारा यांचा समावेश आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांची तपासणी मोहीम सुरू असून, अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार स्वच्छता निकषांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे.

ग्राहकांना अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत अथवा स्वच्छतेबाबत काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. अन्न व औषध प्रशासनामार्फत यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

*शाळांच्या ५० मीटर परिसरात एचएफएसएस पदार्थांच्या विक्रीवर कारवाई*
सोमवारपासून शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट (एचएफएसएस) अर्थात जंक फूड पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. शाळेपासून ५० मीटर परिसरात एचएफएसएस पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध आहे. त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी शाळेच्या ५० मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री करू नये. या परिसरात एचएफएसएस पदार्थांची विक्री केल्याचे आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त (अन्न), पुणे विभाग दि. वा. भोगावडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments