महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे.
दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यासमोरील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून सोडविता येणार नाही, हे ओळखले. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, तो जमिनीत मुरविणे आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र दिला. पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण, पाझर तलाव, गाव तलाव, नाला बांध, माती बंधारे आणि अन्य छोट्या जलसंधारण संरचनांवर त्यांनी भर दिला. जलसंधारणाला स्वतंत्र प्रशासकीय दिशा देत त्यांनी या विषयाला लोकसहभागाची जोड दिली.
१९९१ ते १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही दिशादर्शक ठरतात. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि जलसंधारणाची कामे यांची सांगड घालून त्यांनी जलस्रोत निर्मितीला चालना दिली. जलसंधारण हे केवळ अभियांत्रिकीचे काम नसून गावागावातील नागरिकांच्या सहभागातून उभे राहणारे अभियान आहे, ही भूमिका त्यांच्या कार्यातून स्पष्ट झाली. आज जलयुक्त शिवार, भूजल पुनर्भरण, पाणलोट विकास यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते.
याच योगदानाची दखल घेत दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन १० मे हा २००३ पासून जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. मात्र, स्मृतिदिनाऐवजी जन्मदिवस अधिक उत्साहपूर्ण आणि लोकसहभागातून साजरा व्हावा, या विचारातून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित घटकांशी चर्चा करून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यास मान्यता दिल्यानंतर शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या जलसंधारण चळवळीचा महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे.
व्यापक जनसहभागाची जोड
यंदाचा जलसंधारण दिन केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता त्याला व्यापक जनसहभागाची जोड देण्यात आली आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या अभियानातील सर्वात आकर्षक उपक्रम म्हणजे ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’. २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी तीन किलोमीटरची महा वॉकेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा हजार नागरिकांच्या सहभागाचे उद्दिष्ट असून, राज्यभरातून तीन लाखांहून अधिक नागरिक प्रत्यक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, ‘माय भारत’, क्रीडा संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
ही केवळ चालण्याची स्पर्धा नसून जलसंधारणासाठी जनजागृतीची सामूहिक पावले आहेत. वॉकथॉनच्या प्रारंभी सहभागी नागरिकांकडून मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी अडविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा यंदाच्या अभियानाचा मुख्य संदेश आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेशही या चळवळीला दिशा देणार आहे.
युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ या उपक्रमातून १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना मृद व जलसंधारणाचा संदेश सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे. ३० ते ६० सेकंदांच्या इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून मातीची धूप, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर संदेश देता येणार आहे. अभिनय, संगीत, विनोद, लघुपट, ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून युवकांना आपली कल्पकता सादर करता येणार आहे. #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरून राज्यभरातून मोठ्या प्रमाणात रिल्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
जलसंधारणाचा संस्कार पुढील पिढीवर व्हावा यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निबंध, चित्रकला, पोस्टर, वादविवाद स्पर्धा, जलसंधारणाची शपथ, ‘एक शाळा–एक शोषखड्डा’, जलमित्र किंवा जलदूत घोषित करणे अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना जलसंधारणाशी जोडले जाणार आहे. २१ ऑगस्ट रोजी दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या जलसंधारणविषयक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
अभियानाच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामांनाही गती दिली जाणार आहे. विविध योजनांतर्गत कामांचे भूमीपूजन, लोकार्पण आणि जलपूजन, शेततळी व जलस्रोतांची पाहणी, अमृत सरोवरांच्या परिसरात वृक्षारोपण, नाला, तलाव, विहीर आणि पाझर तलावांची लोकसहभागातून स्वच्छता अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक यांसारख्या उपक्रमांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
जलसंधारणाच्या कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव, लोकसहभागातून श्रमदान, जलस्रोतांचे संवर्धन आणि जनजागृती या माध्यमातून शासन आणि समाज यांच्यातील सहभाग अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समन्वय साधून कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आज हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळीतील घट आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे जलसुरक्षेचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत सुधाकरराव नाईक यांनी दशकांपूर्वी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. जलसंधारणाची कामे किती झाली यापेक्षा ती किती परिणामकारक ठरली, पाणी किती काळ टिकले आणि पुढील पिढीसाठी आपण किती जलसाठा निर्माण केला, हा खरा प्रश्न आहे.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असून त्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.
२१ ऑगस्टचा ‘जलसंधारण दिन’ त्यामुळे केवळ एका महान नेत्याच्या स्मरणाचा दिवस न राहता महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी सामूहिक संकल्पाचा दिवस ठरला पाहिजे. सुधाकरराव नाईक यांना खरी आदरांजली त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात नाही, तर त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्यात आहे. प्रत्येक गावात जलस्रोत जपला, प्रत्येक शेतात पाण्याचा थेंब अडविला, प्रत्येक शाळेत जलसंधारणाचा संस्कार रुजविला आणि प्रत्येक नागरिकाने पाण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच ‘जलसंधारण दिना’चा खरा उद्देश साध्य होईल.
माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर जीवन सुरक्षित राहील आणि लोकसहभाग वाढला तर महाराष्ट्र जलसंपन्न बनेल. चला, सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणाच्या विचारांना कृतीची जोड देऊया—‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा!’
– गजानन पाटील,
विभागीय संर्पक अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
0000


