Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorized*चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधा व वाहतूक सुधारणांना गती;तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त...

*चाकण एमआयडीसीतील पायाभूत सुविधा व वाहतूक सुधारणांना गती;तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावा*- *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश*

▪️*तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त; अतिक्रमणे हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत*

▪️*चाकण एमआयडीसीसाठी सर्वंकष पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थापनाचा आराखडा; दोन महिन्यांत दीर्घकालीन रस्ता सुधारणा आराखडा*

▪️*वाहतूक कोंडीच्या ठिकाणी जंक्शन सुधारणा, पार्किंग-नो पार्किंगची अंमलबजावणी; सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर भर*

पुणे, दि. १४ : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गासह चाकण एमआयडीसी व लगतच्या प्रभावक्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या सुधारणांना गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.

चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला.

यावेळी आमदार बाबाजी काळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता के. एस. भंडारकर, अधीक्षक अभियंता एन. एस. मोढवे, अधीक्षक अभियंता नितीन गवळी, एमआयडीसी पुणे-१चे प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी पुणे-२च्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाथरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजयकुमार भोसले, भरतकुमार बाविस्कर, पीएमआरडीएचे शिवप्रसाद बागड, एमएसआरडीसीचे राम कोल्हे, जी. आर. टेपरे यांच्यासह संबंधित अधिकारी व तांत्रिक सल्लागार उपस्थित होते.

*तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य*
तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या संपूर्ण मार्गावरील खड्डे ३१ ऑगस्टपर्यंत बुजवून मार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. संबंधित रस्ते मालकीच्या यंत्रणांनी तांत्रिक सल्लागारांनी निश्चित केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, नाले आणि नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी करून संबंधित रस्ते मालकीच्या यंत्रणांनी जमीन प्राधिकरणाशी समन्वय साधावा. पुढील १५ दिवसांत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.

*टोटल स्टेशन सर्वेक्षणासह रस्त्यांची मालकी निश्चित करणार*
तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील एचपी चौक ते चाकण या भागाचे टोटल स्टेशन लेव्हल सर्वेक्षण करून त्याची माहिती पुढील आठ दिवसांत तांत्रिक सल्लागारांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले. चाकण एमआयडीसी व लगतच्या प्रभावक्षेत्रातील विविध विभागांच्या अखत्यारितील रस्त्यांची मालकी निश्चित करून त्याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची व संवेदनशील ठिकाणे, रस्ते तसेच ‘रेड झोन’ निश्चित करून त्यावर प्राधान्याने उपाययोजना कराव्यात. आवश्यक त्या सर्व जंक्शनचा आकार व रचना मानकांनुसार सुधारून तेथे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पार्किंग व नो-पार्किंगची ठिकाणे निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

*चाकण एमआयडीसीसाठी सर्वंकष पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थापनाचा आराखडा*
चाकण एमआयडीसी आणि लगतच्या प्रभावक्षेत्रात पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेन व चेंबर्स उभारण्यात यावेत. त्याचबरोबर संपूर्ण क्षेत्रासाठी स्वतंत्र सर्वंकष पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश देण्यात आले.

पाणी साचणारी ठिकाणे, नाले, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आणि विद्यमान निचरा व्यवस्था यांचा एकत्रित अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित कराव्यात. यासाठी संबंधित विभागांनी उपलब्ध माहिती, आराखडे व रेखाचित्रे तांत्रिक सल्लागारांना उपलब्ध करून द्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

दीर्घकालीन रस्ता सुधारणा आराखडा दोन महिन्यांत
विद्यमान रस्ता सुधारणा आराखडे, रेखाचित्रे आणि प्रस्तावांचा अभ्यास करून पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्यांचे कडे, जंक्शन, वाहनतळे, सौंदर्यीकरणाची ठिकाणे तसेच वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आवश्यक बाबींचा समावेश असलेला सर्वंकष दीर्घकालीन रस्ता सुधारणा आराखडा पुढील दोन महिन्यांत तयार करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले.

यापूर्वी विविध विभागांनी केलेल्या विकासकामांचाही या आराखड्यात समावेश करावा. भविष्यात यावर्षी निर्माण झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजनांवर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

*वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीवर भर*
वाहतूक सुरळीत करण्यासाठी निगराणी यंत्रणेचा प्रभावी वापर करून वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाहतुकीतील अडथळ्यांची ठिकाणे निश्चित करावीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व बससेवा अधिक सक्षम करून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य द्यावे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने निश्चित कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करून त्याचा सातत्याने आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

बैठकीस वास्तुविशारद प्रसन्ना देसाई, अर्चना, ट्रॅफिक फ्रिक्शनचे अभिषेक मुतके, प्रसन्ना देसाई आर्किटेक्ट्सचे मंगेश येन्दे, ॲड. निलेश एस. कोडपे, आयटीडीपी इंडियाच्या स्मृती सावणे, सायली गोडबोले, विकास ठाकर, उमेश बी. झगड, मैत्रिली लांगुके, कुणाल कोड, पी. व्ही. पंडित, संजीव पाटील, जितेंद्र पगारे, धनंजय शेडबाळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments