पुणे : इतिहासाची साधने हाताळणारा अभ्यासक निष्पक्ष न्यायाधीश असला पाहिजे. इतिहासाचा अभ्यास करताना केवळ ग्रंथ, आख्यायिका किंवा परंपरांवर विसंबून न राहता उपलब्ध ऐतिहासिक साधनांचे चिकित्सक परीक्षण, परस्पर तुलना आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे आवश्यक आहे. हीच संशोधनाची शास्त्रशुद्ध पद्धत डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी भारतीय इतिहासाच्या अभ्यासात रुजवली, असे प्रतिपादन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी केले.
प्रार्थना समाज, पुणे यांच्या वतीने डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या १०१व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील प्रार्थना समाजाच्या हरि मंदिरात करण्यात आले. यावेळी डॉ. रा. गो. भांडारकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रार्थना समाजाचे विश्वस्त व सचिव दिलीप जोग, डॉ. सुषमा जोग उपस्थित होते.
व्याख्यानात डॉ. बापट यांनी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांचे राजकीय कार्य, प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृत, भाषाशास्त्र, पुराणे, वैष्णव-शैव संप्रदाय, बौद्ध-जैन धर्मांच्या परंपरा, शिलालेख, नाणी, हस्तलिखिते तसेच विविध धर्मग्रंथांच्या आधारे भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी केलेल्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली. तत्पूर्वी डॉ. सुषमा जोग यांनी ईश्वरोपासना केली.
डॉ. श्रीनंद बापट म्हणाले, भांडारकर यांनी आपल्या संपूर्ण जीवनात संशोधनाचा ध्यास कधीही सोडला नाही. समाजसुधारणेच्या विचारांचा त्यांच्या संशोधनावर कधीही परिणाम होऊ दिला नाही. या दोन्ही गोष्टी त्यांनी स्वतंत्र ठेवल्या. त्यांनी वैष्णव, शैव आणि इतर धार्मिक संप्रदायांच्या इतिहासाचा तसेच धर्मग्रंथांचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून भारतीय धर्मपरंपरेच्या ऐतिहासिक विकासावर प्रकाश टाकला. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास ११३ वर्षांनंतरही केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
दिलीप जोग म्हणाले, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे विज्ञानवादी होते. प्रार्थना समाजाच्या कार्याशी दीर्घकाळ संबंधित असलेले ते प्रमुख समाजसुधारक होते. प्रार्थना समाजाच्या धार्मिक-सामाजिक विचारांना त्यांनी वैचारिक आधार दिला. प्रार्थना समाजाच्या सुरुवातीच्या नियमांमध्ये मूर्तिपूजा करू नये, असे कलम असताना त्यांनी त्यात बदल करून मूर्तिपूजा हे ईश्वरउपासनेचे खरे साधन नाही, असा बदल केला. त्याचबरोबर विज्ञाननिष्ठा , जातिभेद विरोध, स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार ही त्यांच्या कार्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे विचार आजही तरुणांना मार्गदर्शक आहेत असेही त्यांनी सांगितले.
डॉ. शिल्पा मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले.


