Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorized*एसआयआरअंतर्गत दावे-हरकतींच्या सुनावणी प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण* *मतदार यादीचे पुनरीक्षण ...

*एसआयआरअंतर्गत दावे-हरकतींच्या सुनावणी प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण* *मतदार यादीचे पुनरीक्षण नियोजनपूर्वक व समन्वयाने करूया* *-उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर*

पुणे, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील दावे व हरकतींच्या सुनावणी प्रक्रियेबाबत आज उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मतदार यादीचे पुनरीक्षण करताना प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी नियोजनपूर्वक व समन्वयाने काम करूया असे सांगताना सुनावणी प्रक्रियेदरम्यान नागरिकांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात विधानसभा मतदारसंघांचे नोडल अधिकारी, त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सहाय्यक मदत कक्षातील नियुक्त कर्मचारी तसेच तांत्रिक सहाय्यक यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान एसआयआरअंतर्गत दावे व हरकतींची सुनावणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि संबंधित नोंदींच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मतदार यादीच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन करून श्रीमती कळसकर यांनी प्रक्रियेबाबत सादरीकरण केले.

मतदार यादीतील नोंदी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत आता सुनावणी व कागदपत्र पडताळणीच्या टप्प्याला वेग येणार आहे. मतदारांकडून सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची संबंधित विभागांकडून पडताळणी करून पात्रतेबाबत निर्णय घेण्यात येणार असून, यासाठी विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
एसआयआर प्रक्रियेत सुनावणीदरम्यान मतदारांकडून सादर होणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या पात्रतेची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी जुन्या शासकीय नोंदी, जन्म दाखले, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट, जातीचे प्रमाणपत्र तसेच अन्य अधिकृत कागदपत्रांचा विचार केला जाणार आहे.

भारत सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांनी १ जुलै १९८७ पूर्वी जारी केलेली कागदपत्रे पडताळणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्याचबरोबर सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्म दाखला, पासपोर्ट, दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचाही विचार केला जाणार आहे.

कागदपत्र पडताळणीसाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, पासपोर्ट कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू नोंदी, ग्रामपातळीवरील दाखले, पासपोर्ट तसेच दहावी-बारावीच्या प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित विभागांकडून करून घेण्यात येणार असल्याचे श्रीमती कळसकर यांनी सांगितले.

सर्व विभागांच्या अधिकाऱ्यां सोबत आवश्यक समन्वय बैठका घेण्यात आल्या आहेत. सुनावणीदरम्यान प्राप्त होणाऱ्या प्रकरणांनुसार आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. कागदपत्रांबाबत शंका असल्यास संबंधित मतदाराकडून अतिरिक्त पुरावे मागविले जाऊ शकतात. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पात्रतेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एसआयआर प्रक्रियेतील हा टप्पा महत्त्वाचा असून, विविध विभागांकडील जुन्या नोंदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मतदारांच्या दाव्यांची वस्तुनिष्ठ तपासणी करून अधिक अचूक व विश्वासार्ह अंतिम मतदार यादी तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे श्रीमती खळसकर यांनी सांगितले.

प्रशिक्षणार्थींनी एसआयआर प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यातील काही अडचणींबाबत विचारलेल्या प्रश्नांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कळसकर यांनी उत्तरे दिली. तसेच, या प्रक्रियेत कुठेही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विधानसभा मतदारसंघांचे नोडल अधिकारी, त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सहाय्यक मदत कक्षातील नियुक्त कर्मचारी तसेच तांत्रिक सहाय्यक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments