डीआरएचपी लिंक:
https://www.axiscapital.co.in/contents/Aragen%20Life%20Sciences%20Limited-DRHP-1787813102.pdf
अराजेन लाइफ साइंसेज लिमिटेड ही आघाडीची कॉन्ट्रॅक्ट रिसर्च, डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन (CRDMO) असून कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सेबीकडे सादर केला आहे.
या आयपीओमध्ये 800 कोटी रु.चे फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या एकूण 27,329,192 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे.
फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर कर्जांची परतफेड आणि/किंवा आगाऊ परतफेड करण्यासाठी; हैदराबाद येथील कंपनीच्या सुविधा केंद्रांसाठी नवीन उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता कंपनीकडून करण्यात येणाऱ्या भांडवली खर्चासाठी; कंपनीच्या महत्त्वपूर्ण उपकंपन्यांपैकी एक असलेल्या अराजेन बायोलॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेडकडून बंगळुरू येथील सुविधा केंद्रासाठी नवीन उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता करण्यात येणाऱ्या भांडवली खर्चासाठी; तसेच कंपनीच्या विस्ताराच्या पुढील टप्प्याला पाठबळ देण्यासाठी सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करण्याचा प्रस्ताव आहे.
2000 मध्ये स्थापन झालेली अराजेन लाइफ साइंसेज ही पूर्णपणे एकात्मिक कॉन्ट्रॅक्ट रिसर्च, डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन (“CRDMO”) असून, जीवन विज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्ण कंपन्या आणि उदयोन्मुख कंपन्यांना सेवा पुरवते. कंपनी औषध विकासाच्या संपूर्ण जीवनचक्रात सर्वसमावेशक उपाययोजना उपलब्ध करून देते. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट डिस्कव्हरी आणि प्री-क्लिनिकल रिसर्च सोल्युशन्स (“CRO” किंवा “कॉन्ट्रॅक्ट रिसर्च”) तसेच लहान रेणू आणि बायोलॉजिक्स या दोन्हींसाठी कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स (“CDMO”) यांचा समावेश आहे.
25 वर्षांहून अधिक कार्यकाळात, 31 मार्च 2026 रोजी मूल्यांकन केलेल्या भारतीय समकक्ष कंपन्यांमध्ये औषध विकास मूल्यसाखळीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या उपाययोजनांच्या संख्येच्या बाबतीत अराजेन लाइफ साइंसेज ही सर्वात मोठी CRDMO बनली आहे. तसेच, मूल्यांकन केलेल्या भारतीय समकक्ष कंपन्यांमध्ये कामकाजामधून मिळणाऱ्या महसुलाच्या बाबतीत कंपनी भारतातील तीन सर्वात मोठ्या CRDMO पैकी एक बनली आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2026 मध्ये अंदाजे 171 अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या जागतिक CRDMO बाजारपेठेत कार्यरत आहे.
कंपनी नवीन केमिकल एंटिटीज (“NCEs”) आणि नवीन बायोलॉजिकल एंटिटीज (“NBEs”) मध्ये कार्यरत असलेल्या जीवन विज्ञान कंपन्यांवर लक्ष केंद्रित करते. आर्थिक वर्ष 2026 मध्ये अमेरिका, युरोप, जपान, भारत आणि इतर APAC बाजारपेठांसह प्रमुख बाजारपेठांमध्ये कंपनीने जागतिक स्तरावर 591 ग्राहकांना धोरणात्मक भागीदार म्हणून सेवा दिली. कंपनीच्या ग्राहकवर्गात बिग फार्मा कंपन्या, मोठ्या औषधनिर्मिती कंपन्या, छोट्या जैवतंत्रज्ञान कंपन्या आणि मध्यम आकाराच्या औषधनिर्मिती कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, प्राणी आरोग्य, कृषी रसायने आणि विशेष रसायने या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. 31 मार्च 2026 पर्यंत अग्रणी 20 बिग फार्मा ग्राहकांपैकी 16 ग्राहकांसोबत अराजेन लाइफ साइंसेज काम केले होते
अराजेन लाइफ साइंसेज 2002 मध्ये आपला CRO व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर 31 मार्च 2026 रोजी मूल्यांकन केलेल्या भारतीय समकक्ष कंपन्यांमध्ये विज्ञान कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारतातील दुसरा सर्वात मोठा CRO सोल्युशन्स प्लॅटफॉर्म म्हणून विस्तार केला आहे. 31 मार्च 2026 रोजी मूल्यांकन केलेल्या समकक्ष कंपन्यांमध्ये एकात्मिक लहान रेणू औषधातील सक्रिय घटक (drug substance) आणि औषध उत्पादन (drug product) विकास सेवा उपलब्ध करून देणाऱ्या दोन भारतीय CRDMO पैकी कंपनी एक आहे. 2014 मध्ये अधिग्रहणाद्वारे जीवशास्त्रीय अर्थात बायोलॉजिक्स सेवा देणारी अराजेन लाइफ साइंसेज ही भारतातील दुसरी CRDMO ठरली आणि त्यानंतर बायोलॉजिक्स CRDMO मूल्यसाखळीमध्ये एकात्मिक “gene-to-GMP” सोल्युशन्स उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने आपल्या क्षमतांचा विस्तार केला आहे. तिच्या बायोलॉजिक्स CRDMO प्लॅटफॉर्मला एकात्मिक अमेरिका–भारत सेवा वितरण मॉडेलचे पाठबळ आहे. यामध्ये अमेरिकेतील सेल लाइन डेव्हलपमेंट आणि सुरुवातीच्या टप्प्यातील संशोधनासोबत भारतातील किफायतशीर विकास आणि उत्पादन क्षमतांचा समावेश आहे.
31 मार्च 2026 रोजी कंपनीच्या कर्मचारीवर्गात 4,362 कर्मचारी होते. यामध्ये 3,412 विज्ञान कर्मचारी असून त्यापैकी 479 जणांकडे पीएचडी पदवी आहे. F&S अहवालानुसार, 31 मार्च 2026 रोजी भारतीय CRDMO उद्योगाच्या अंतर्गत कंपनीमध्ये PhDधारक कर्मचारी ते विज्ञान कर्मचारी असे सर्वाधिक गुणोत्तर प्रमाण 14.04% इतके होते. यावरून कंपनीतील संशोधनासाठी वाहून घेतलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि वैज्ञानिक तज्ज्ञतेची सखोलता दिसून येते.
कंपनीने पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (“ESG”) उपक्रम तसेच कॉर्पोरेट प्रशासनाच्या पद्धतींवर सुसंगत पद्धतीने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये शाश्वततेसाठीची बांधिलकी, जबाबदार व्यावसायिक आचरण आणि व्यावसायिक व्यवस्थापन पथकाच्या पाठबळासह संचालक मंडळाच्या नेतृत्वाखालील देखरेखीचा समावेश आहे. अराजेन लाइफ साइंसेज आर्थिक वर्ष 2026 मध्ये गोल्ड इकोव्हॅडिस सस्टेनेबिलिटी रेटिंग मिळाले. त्यामुळे जागतिक स्तरावरील अग्रणी 5% कंपन्यांमध्ये तिचा समावेश झाला आहे. तसेच, कंपनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये सायन्स बेस्ड टार्गेट इनिशिएटिव्ह (“SBTi”)ची सिग्नेटरी बनली आणि 2022 मध्ये फार्मास्युटिकल सप्लाय चेन इनिशिएटिव्ह (“PSCI”)ची सहयोगी सदस्य बनली.
F&S अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2025 ते आर्थिक वर्ष 2026 दरम्यान कामकाजामधून मिळणाऱ्या महसुलातील वाढीच्या बाबतीतही मूल्यांकन केलेल्या भारतीय समकक्ष कंपन्यांमध्ये कंपनीने दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ नोंदवली. आर्थिक वर्ष 2024 पासून अनुक्रमे 14.64%, 26.86%, 15.63% आणि 29.91% या CAGR दराने कंपनीचा कामकाजामधून मिळणारा महसूल, वर्षातील नफा, समायोजित EBITDA आणि वर्षातील समायोजित नफा वाढला आणि आर्थिक वर्ष 2026 मध्ये अनुक्रमे 21,783.92 दशलक्ष रु., 2,576.44 दशलक्ष रु., 5,937.65 दशलक्ष रु. आणि 2,839.85 दशलक्ष रु. इतका झाला. ही वाढ साध्य करताना कंपनीने भांडवली कार्यक्षमतेवरही कायम लक्ष केंद्रित ठेवले. कंपनीचा ROCE आणि ROE अनुक्रमे 18.18% आणि 11.96% होता.
अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.


