Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*देशाचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची* *खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी यांचे मत ; पुणे...

*देशाचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची* *खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी यांचे मत ; पुणे सार्वजनिक सभेच्या १५४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन*

पुणे ः आज जगभरात भारताची प्रतिमा बदलली आहे. भारतीयांकडे अत्यंत आदराने पाहिले जाते. असा देश कसा घडतो? आधी विद्यार्थी घडतो मग तो सजग नागरिक होतो आणि त्यानंतर तो देशाला घडतो. हे सजग नागरिक शाळेतून घडतात. देशाचे भवितव्य हे शाळेच्या खोल्यातून घडत असते. हे भवितव्य घडविण्याची जबाबदारी शिक्षक करीत असतात, असे मत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पुणे सार्वजनिक सभेच्या १५४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विद्याधर पंत नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे, कार्यवाह शरद गर्भे, विश्वस्त अरविंद नवरे, विमल भालेराव, धनाजी चेन्ने, सुरेश कालेकर, विजय मराठे, सुभाष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याध्यक्षा कलावती सुर्वे यांना रमाबाई रानडे पुरस्कार, पुण्यातील महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक ज्ञानेश्वर दाते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, जगातील बलाढ्य देश भारताच्या अटींवर चालत आहेत इतकी ताकद आज देशाची निर्माण झाली आहे. याचे उदाहरण म्हणजे युक्रेनचे युद्ध. आपल्या देशाने जगाला कोविडची लस दिली, चंद्रावर यान उतरविले, इतकी क्षमता भारतातची निर्माण झाली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, बाजीराव पेशवे यांचा इतिहास पाठ्य पुस्तकात अत्यंत तोकडा सांगितला आहे. परंतु आणखी माहिती सांगण्याची, इतिहास रंगवून सांगण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. मुलांमध्ये तो इतिहास भिनला पाहिजे.

त्या पुढे म्हणाल्या, नरेंद्र मोदी प्रथम प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथम संसदेत जाताना संसदेच्या पायरीवर डोके ठेवून नमस्कार करीत सांगितले होते की, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधानसेवक आहे. तिच भावना मनात ठेवून मी देखील त्याचे अनुकरण करणार आहे. मंत्री म्हणून नाही तर सेवक म्हणून पुण्याच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहून काम करण्याचे वचन देते, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देत कलावती सुर्वे म्हणाल्या, माझे वडिल गिरणी कामगार होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गुप्त बातम्या स्वातंत्र्य सैनिकांनी देण्याचे काम माझ्या वडिलांनी केले होते. त्यामुळे देशासाठी काम करण्याचे बाळकडू हे घरातूनच मिळाले. देशासाठी काम कर, समाजासाठी काम कर ही त्यांची शिकवण आजही मी पूर्ण करीत आहे आणि करत राहणार. आज मिळालेला पुरस्कार ही समाजाची कृतज्ञता आहे, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कारार्थी ज्ञानेश्वर दाते यांनी देखील संस्थेचे आभार मानत मनोगत व्यक्त केले.

विद्याधर नारगोलकर म्हणाले, या संस्थेच्या वास्तूचे असे भाग्य आहे की ज्याचा इथे सत्कार झाला तो वरच्या पदावर पोहचला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी होळीचा कार्यक्रम इथे केला, त्याची धग लंडनपर्यंत पोहोचली होती. येथे रश्मी शुक्ला यांचा सत्कार केला, आज त्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक झाल्या आहेत. संस्थेच्या कार्यासाठी शहरात उत्तम जागा मिळावी, अशी विनंती त्यांनी केली.

स्वागत व प्रास्ताविक अनिल शिदोरे यांनी केले. निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. संस्थेचे काही नवीन प्रकल्पही हाती घेण्यात येणार असल्याचे शिदोरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments