*
पुणे, दि. ३१ : आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश निर्गमित केला आहे.
हा आदेश २ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेपासून १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच १४ दिवस लागू राहणार आहे. आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दांडे, शस्त्रे, सुरे, कोयते, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगणे किंवा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच व्यक्तींचे किंवा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे, चित्रे अथवा प्रतिमा यांचे प्रदर्शन व दहन करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
मोठ्या आवाजात अवमानकारक घोषणा देणे, वाद्य वाजविण्यामुळे सभ्यता किंवा नैतिकतेस धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल किंवा राज्य उलथून टाकण्यास प्रवृत्त करणारी आक्षेपार्ह भाषणे करणे अथवा कोणतीही वस्तू तयार करून तिचा जनतेत प्रसार करणे, अशा कृत्यांनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमविण्यास किंवा पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता सभा अथवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय सेवेत कर्तव्य बजावण्यासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत कळविण्यात आले आहे.
००००


