पुणे,१ सप्टेंबर २०२६ : भारतात नेत्रदान करणाऱ्यांच्या आणि कॉर्नियाच्या प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत मोठी तफावत आहे.अशा परिस्थितीत प्रगत कॉर्निया शस्त्रक्रिया तंत्रामुळे प्रत्येक दान झालेला कॉर्निया अधिक प्रभावीपणे वापरण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्प्लिट कॉर्निया ट्रान्सप्लांट या तंत्रामुळे कॉर्नियाचे विशिष्ट स्तरांमध्ये विभाजन करून रूग्णांच्या गरजेनुसार व विविध कॉर्नियाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या दोन भिन्न रूग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे.
हे तंत्र भारतात विशेष करून महत्त्वाचे आहे.याचे कारण नेत्रदान करणाऱ्या व्यक्तींची संख्या खूप कमी आहे,आणि त्यामुळे कॉर्नियाच्या उपलब्धतेचा तुटवडा जाणवतो.भारतात अंदाजे 1 कोटी लोकं अंशत: किंवा पूर्णत: अंधत्वाने ग्रस्त आहेत.यात दरवर्षी 2 लाख नवीन रूग्णांची भर पडते.देशभरातील सुमारे 750 नेत्रपेढ्यांमधून अंदाजे 40,000 ते 50,000 कॉर्निया मिळवले जातात.मात्र यापैकी प्रत्यारोपणासाठीचा वापर साधारण 50 टक्के आहे.म्हणूनच नेत्रदानाबाबत जागरूकता आणि दान झालेल्या प्रत्येक कॉर्नियाचा प्रभावी वापर यामुळेच ही तफावत दूर होऊ शकते.25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान नेत्रदान जागरूकता पंधरवड्याचे यामुळेच विशेष महत्त्व आहे.
कॉर्निया म्हणजे डोळ्याचे बाह्य आवरण असलेली पारदर्शक ऊतक असते,याच्या दात्यांची अत्यंत कमतरता आहे.अशा परिस्थितीत नेत्रशल्यचिकित्सकांच्या एका विशेष टीमने कॉम्पोनंट कॉर्नियल शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या केली.या तंत्रामध्ये दात्याच्या ऊतकाचे विभाजन विशिष्ट शारीरिक रचनांनुसार (ॲनाटॉमीकल लेअर्स) विभाजित केले जाते. यामुळे एका मौल्यवान दानाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे शक्य होते.
नुकत्याच झालेल्या एका स्प्लिट कॉर्निया ट्रान्सप्लांट बाबत माहिती देताना पीबीएमएच्या एचव्ही देसाई आय हॉस्पिटलमधील कॉर्निया विभाग प्रमुख व नेत्रपेढीच्या वैद्यकीय संचालिका डॉ.शिल्पा जोशी यांनी सांगितले की, पारंपारिक पध्दतीमध्ये केरॅटोप्लास्टी या प्रक्रियेद्वारे संपूर्ण कॉर्निया प्रत्यारोपित केला जातो.याचाच अर्थ दात्याकडून मिळालेला एक कॉर्निया हा एकाच रूग्णाला उपयुक्त ठरतो.मात्र आधुनिक वैद्यक शास्त्रामुळे शल्यचिकित्सकांना रूग्णाचे किंवा प्राप्तकर्त्याचे निरोगी ऊतक कायम राखत केवळ खराब झालेला भाग किंवा थर बदलता येतो.
त्यापुढे म्हणाल्या की,या प्रक्रियेसाठी कॉर्नियाशी संबंधित पूर्णपणे भिन्न विकार असलेल्या दोन प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांची निवड करण्यात आली.त्यामुळे एकाच दात्याच्या कॉर्नियाने प्रत्यारोपणासाठी दोन कार्यक्षम भागांमध्ये विभाजन करणे शक्य झाले.
प्राप्तकर्त्यांमध्ये गेली 10 ते 15 वर्षांपासून विषाणू संसर्गामुळे डोळ्याची सातत्याने दृष्टी कमी होत असलेले (लेफ्ट आय हर्पिस सिम्प्लेक्स कॅराटायटिस) जामखेड येथील 76 वर्षीय शेतकरी पुरूष रूग्णाचा समावेश आहे.तर दुसऱ्या प्राप्तकर्त्या या 67 वर्षीय महिला रूग्ण असून त्यांना उजव्या डोळ्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर कॉर्निया वर सूज येऊन तो अपारदर्शक झाला होता.
हे सर्व दात्याच्या कुटुंबाने नेत्रदानाची संमती दिल्याने होऊ शकले.17 जून 2026 रोजी एका 60 वर्षीय व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने नेत्रदानाचा निर्णय घेतला.त्यानंतर यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (वायसीएम) तर्फे नेत्रदानासाठी समन्वयन व प्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल येथील प्रदीर्घ अनुभव असलेल्या कौन्सिलर मनिषा पांढरे यांनी व्ही फॉर ऑर्गन या संस्थेचे प्रतिनिधी श्री.आपटे यांच्याबरोबर काम करत व वेळेचे महत्त्व ओळखत दात्याचा कॉर्निया काढण्याच्या दृष्टीने कुटुंबाबरोबर संवाद साधला.त्यानंतर काढलेला कॉर्निया सुरक्षितपणे एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या नेत्रपेढीत आणण्यात आले.
संपूर्ण टीमचे कौतुक करताना पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक (नेटवर्क) डॉ.राहुल देशपांडे म्हणाले की,भारतात कॉर्नियाची तीव्र कमतरता भासत असून हजारो रूग्ण याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे प्रत्येक कॉर्नियाचा इष्टतम वापर हा अत्यंत महत्त्वाचा झाला असून डॉ.शिल्पा जोशी यांच्या नेतृत्वाखालील टीमने कॉम्पोनंट शस्त्रक्रिया करत याचे महत्त्व दर्शवले आहे.
डॉ.शिल्पा जोशी म्हणाल्या की,अशा कॉम्पोनंट शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाच्या कॉर्नियाचा मुळ भाग तसाच राहिल्याने प्रत्यारोपित अवयव नाकारल्या जाण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. तसेच शस्त्रक्रियेनंतर दृष्टीची प्रगती ही पारंपरिक प्रत्यारोपणापेक्षा लक्षणीयरित्या जास्त असते.
दोन्ही रूग्ण आता चांगली प्रगती करत असून येत्या काही आठवड्यात त्यांच्या दृष्टीमध्ये अधिक सुधार होईल.


