पुणे : रणांगणातील संघर्ष संपला असला, तरी देशासाठी दिलेल्या त्यागाच्या खुणा या जवानांच्या शरीरावर कायम आहेत. त्या खुणांकडे केवळ दिव्यांगत्व म्हणून न पाहता त्यांच्या शौर्याची ओळख म्हणून पाहण्याचा संदेश देत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तीनशेपेक्षा अधिक जवानांच्या मनगटावर राखी बांधण्यात आली. पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर आणि क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये हा स्नेह सोहळा पार पडला.
सैनिक मित्र परिवारातर्फे आयोजित या उपक्रमातून जवानांच्या त्यागाला समाजाच्या कृतज्ञतेची ऊब मिळाली. यावेळी सीमा शिंदे, कल्याणी सराफ, उमा ताटके, मंजुळा भालिया, राखी कोकाटे, सारिका गायकवाड आणि सुवर्णा कुलाल उपस्थित होत्या. त्यांनी जवानांना राखी बांधून त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम केला. विश्वेश्वर सहकारी बँक, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, आर्ट ऑफ लिव्हिंग, लव्ह केअर शेअर फाऊंडेशन मधील पंचवीस पेक्षा अधिक भगिनींचा सहभाग देखील होता.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवानांना राखी बांधण्यासाठी आलेल्या महिलांनी त्यांच्याशी संवाद साधत आपुलकीने शुभेच्छा दिल्या. राखी बांधताना अनेक जवानांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. काही क्षणांसाठी पुनर्वसन केंद्रातील दैनंदिन वातावरणात सणाचा उत्साह, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवायला मिळाला.
आनंद सराफ म्हणाले, देशासाठी कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या जवानांच्या त्यागाप्रती देशवासीयांच्या मनात असलेली कृतज्ञता अशा उपक्रमातून व्यक्त होते. जवानांसाठी मिळणारे हे प्रेम आणि आपुलकी ऊर्जादायी आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काही क्षण घालवून त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, हीच या उपक्रमामागची भावना आहे.


