पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांना ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची विनामूल्य संधी मिळणार आहे. स्टडी स्मार्टतर्फे १२ सप्टेंबर रोजी रॉयल कनॉट, बोट क्लब येथे ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे; अशी माहिती स्टडी स्मार्टचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना जैन म्हणाले, “आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या अनेक संधी विद्यार्थ्यांसमोर आहेत. मात्र, योग्य निर्णय घेण्यासाठी अचूक माहिती महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना विद्यापीठांशी थेट संवाद साधता यावा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, हा मेळाव्याचा उद्देश आहे.”
या मेळाव्यात यूके, अमेरिका, आयर्लंड, जर्मनी, दुबई, ऑस्ट्रेलिया तसेच युरोपमधील विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठ व अभ्यासक्रम निवड, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, आर्थिक मदत तसेच परदेशातील शिक्षणानंतरच्या करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
परदेशी शिक्षणासाठी वाढती पसंती असली, तरी योग्य विद्यापीठ आणि अभ्यासक्रमाची निवड, प्रवेशाच्या अटी, शिष्यवृत्ती मिळविण्याची प्रक्रिया तसेच शिक्षणासाठी आर्थिक नियोजन ही विद्यार्थ्यांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर मेळाव्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संवादाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मेळाव्यात विद्यापीठ निवड, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, IELTS मधील सूट, स्पॉट अॅडमिशनच्या संधी, शिक्षणानंतरच्या कामाच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय करिअर यावर चर्चासत्रे व कार्यशाळा होणार आहेत. स्टडी स्मार्टचे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमी आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार योग्य अभ्यासक्रम, विद्यापीठ व शिक्षणाचे ठिकाण निवडण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय शिक्षण कर्ज, विद्यार्थी निवास, परकीय चलन, प्रवास सहाय्य आणि करिअर समुपदेशनासाठी स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष असणार आहेत. जपानमधील उच्च शिक्षण व करिअरच्या संधींची माहिती देण्यासाठी भारतातील जपानच्या दूतावासाच्या पाठबळाने कार्यरत MOSAI या संस्थेचा विशेष सहभाग असणार आहे. पुण्यातील अभ्यासासाठी परदेशगमन मेळाव्यात MOSAIचा हा पहिलाच सहभाग असल्याचे जैन यांनी सांगितले.
विद्यार्थी आणि पालकांसाठी मेळावा खुला असून नोंदणी विनामूल्य आहे. इच्छुकांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९८२१५ ७८९८८ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.


