Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमी आजही भिक्षुकी करते, हा विषय पैशांचा नाही, तर माझ्या अस्तित्वाचा आहे....

मी आजही भिक्षुकी करते, हा विषय पैशांचा नाही, तर माझ्या अस्तित्वाचा आहे. सई राजेंद्र भराट यांचे मत : ‘केशव सन्मान पुरस्कार’ प्रदान हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक असलेल्या केशव शंखनाद पथकाचा १०वा वर्धापन दिन

पुणे : माझा समुदाय अत्यंत संघर्षातून आज इथपर्यंत पोहोचला आहे. मी आजही भिक्षुकी करते. हा विषय पैशांचा नाही, तर माझ्या अस्तित्वाचा आहे. मला तृतीय क्रमांकाचे स्थान दिले जाते. पण प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर कोण आहे? हे क्रमांक ठरवणारे कोण? मीसुद्धा तुमच्यासारखाच आहे. मी तुमचाच एक भाग आहे. मी वेगळा नाही. माझे मन, माझ्या भावना आणि माझ्या संवेदना तुमच्यासारख्याच आहेत. तुमच्याकडून माझ्याकडे पाहण्याची एकतर्फी दृष्टी असणे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. काही लोक मला वेगळ्या वर्गात ठेवतात. अशा वेळी मला त्यांना विचारावेसे वाटते जर मी तिसऱ्या वर्गातला असेन, तर पहिल्या वर्गात कोण आहे? स्त्री की पुरुष? आणि प्रत्येक व्यक्तीचा वर्ग ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे मत तृतीयपंथीय हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या सई राजेंद्र भराट (सई नगरकर) यांनी व्यक्त केले.

 

हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक म्हणून ओळख असलेल्या केशव शंखनाद पथकाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक सन्मानासाठी तसेच धार्मिक व सामाजिक प्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सई राजेंद्र भराट (सई नगरकर) यांना ‘केशव सन्मान पुरस्कार २०२६’ टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. चिदंबरमेश्वर महाराज साखरे (श्री गुरु साखरे महाराज साधक आश्रम, आळंदी) होते. केशव शंखनाद पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन, किशोर चव्हाण, पथकाचे सचिव रणजीत हगवणे, काळूराम डोमाळे, शीला गिरमे, अरुण कापसे, सुहास मदनाल, प्रमोद डोंगरे, शैलेंद्र भालेराव, महेंद्र बेचवडे यांच्या सह पथकाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

 

सई भराट म्हणाल्या, समाजापासून वंचित घटकाला तुम्ही आपलेसे केले, सन्मानित केले, याबद्दल शंखनाद पथकाचे आभार व्यक्त करते.

ज्या सनातन धर्माने माझ्या समुदायाला सन्मान दिला, त्यांच्यासाठी बोलणे हेही माझे कर्तव्य आहे. जिथे कुठे अन्याय किंवा चुकीची घटना घडत असेल आणि माझ्या लक्षात येत असेल, तिथे त्याविरोधात आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे. जी व्यक्ती भिक्षुकी करते, तिने प्रत्येकाच्या दारात जाऊन धर्माची बाजू मांडणे, धर्माबद्दल सांगणे आणि धर्माचा विचार पुढे नेणे, हेच खरे धर्मकार्य आहे.

 

ह. भ. प. चिदंबरमेश्वर महाराज साखरे म्हणाले, समस्या मांडणाऱ्यांची संख्या मोठी आहे; मात्र त्यावर उपाय सांगणारे कमी आहेत. सनातन धर्माने जितक्या प्रकारची चिकित्सा स्वीकारली, तितकी व्यापकता जगातील अन्य कोणत्याही धर्माने स्वीकारलेली नाही. असे असतानाही आपल्या धर्माविषयी बोलणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. मंदिरांमध्ये प्रबोधन, समाजाचे एकत्रीकरण आणि धर्मजागरण झाले पाहिजे. काही ठिकाणांहून केवळ आदेश निघतात; मात्र आपल्यात संवादाचा अभाव आहे. घरात, कुटुंबातही संवाद राहिलेला नाही.

 

ते पुढे म्हणाले, उत्सव अधिक सकारात्मक पद्धतीने कसे करता येतील, याचा विचार झाला पाहिजे. उत्सवांच्या निमित्ताने हिंदू समाज मोठ्या संख्येने एकत्र येतो. त्यामुळे समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि प्रबोधनासाठी याच माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केला पाहिजे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था मंदिरांच्या माध्यमातून चालली पाहिजेत.

 

किशोर चव्हाण म्हणाले, कोणत्याही उपक्रमाच्या यशासाठी सातत्य महत्त्वाचे आहे. आपण सातत्याने शंखनाद पथकाशी जोडलेले असून, शंखनादामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे शंखनाद पथक निर्माण झाले आहे. त्यामुळे शंखनादापुरते मर्यादित न राहता व्यसनाधीनता निर्मूलन, सामाजिक समरसता आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे संवर्धन अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्येही आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.

 

नितीन महाजन म्हणाले, मंदिरे ही समाजाच्या एकत्रीकरणाची आणि शक्तीची केंद्रे आहेत. मात्र, कालांतराने मंदिरांमध्ये एकत्र येण्याची परंपरा कमी होत गेली. ही उणीव भरून काढण्यासाठी शंखनाद पथकाची स्थापना करण्यात आली. अवघ्या चार जणांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार ५०० सदस्य आणि ३७ केंद्रांपर्यंत पोहोचला आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका व लंडन या देशात देखील प्रशिक्षण वर्ग सुरू करून शंखनादाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याबरोबरच शंखनादाचे आरोग्यासाठीही अनेक

फायदे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments