पुणे, दि. १०: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी प्राथमिक लागवड किट, अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती तसेच अस्तित्वात असलेल्या शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकांसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंबेगाव, जुन्नर, राजगुरुनगर, मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत स्ट्रॉबेरी लागवड किटसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती आणि अस्तित्वात असलेल्या शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकांसाठीही शासनाच्या निर्धारित मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा आदिवासी शेतकरी असणे आवश्यक असून, यापूर्वी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. योजनेतील इतर घटकांचा लाभ घेण्यासाठी स्ट्रॉबेरी प्राथमिक लागवड हा घटक अनिवार्य आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसोबत अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती किंवा अस्तित्वात असलेल्या शेततळ्याचे अस्तरीकरण यापैकी एका घटकाचा लाभ घेता येणार आहे.
लाभार्थी निवडीनंतर संबंधित कामे तांत्रिक निकषांनुसार विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. मंजूर मापदंडापेक्षा अधिक होणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे.
अर्जासाठी ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र/दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स आणि हमीपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालयामार्फत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००


