ओजीपी 2026 मध्ये पेरिटोनियल सरफेस ऑन्कोलॉजी, स्त्रीरोग विषयक कर्करोग, सीआरएस, एचआयपीईसी आणि कर्करोग उपचारातील उदयोन्मुख पद्धतींवर होणार विशेष चर्चा
पुणे, 11 सप्टेंबर 2026 : ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणे (ओजीपी 2026) तर्फे पेरिटोनियल सरफेस ऑन्कोलॉजी (ओटीपोटातील अवयवांच्या भोवती असणाऱ्या पातळ पडद्यावर होणारा कर्करोग) आणि गायनॅकोलॉजिक ऑन्कोलॉजी (स्त्रीरोगविषयक कर्करोगशास्त्र) या विषयांवर आयोजित करण्यात आलेली तिसरी द्वैवार्षिक परिषद 18 आणि 19 सप्टेंबर 2026 रोजी हयात रीजन्सी पुणे येथे होणार आहे.१७ सप्टेंबर रोजी सिम्बायोसिस स्किल्स लॅब येथे पूर्वपरिषद वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत ऑन्कोलॉजी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीचे कर्करोग तज्ञ कर्करोगाच्या गुंतागुंतीच्या आणि प्रगत अवस्थेतील निदान व उपचारांमधील प्रगतीवर चर्चा करणार आहेत. ही परिषद चिकित्सकांना आपले कौशल्य व अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, उपचार क्षेत्रातील नव्या संशोधनावर चर्चा करण्यासाठी तसेच कर्करोग उपचारातील नाविन्यपूर्ण आणि बहुशाखीय दृष्टिकोनांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्यासपीठ ठरणार आहे.ही माहिती ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणेचे अध्यक्ष व एम.एन.बुधराणी कॅन्सर इन्स्टिट्युट येथील वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.देबांशु भादुरी, स्टर्लिंग हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.राकेश नेवे , रूबी हॉल क्लिनिक येथील कर्करोग तज्ञ डॉ.नागेश शिरसाट, अपोलो हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक आयोजन सचिव डॉ.स्निता सिनुकुमार आणि सह्याद्रि हॉस्पिटल येथील कर्करोग तज्ञ डॉ.तुषार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेच्या आयोजन समितीमध्ये इंद्रायणी हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.शैलेश नाईक, अपोलो हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.विदिता पोवले, रूबी हॉल क्लिनिक येथील कर्करोग तज्ञ डॉ.नागेश शिरसाट, अपोलो हॉस्पिटल येथील रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ.श्वेता मुथा, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.अनुप ताम्हणकर, स्टर्लिंग हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.राकेश नेवे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथील कर्करोग तज्ञ डॉ.जयंत गावंडे आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील कर्करोग तज्ञ डॉ.राहुल कुलकर्णी यांचा समावेश आहे.
या परिषदेत पेरिटोनियल सरफेसशी संबंधित कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, पेरिटोनियममध्ये प्रसार झालेला जठरांत्राचा कर्करोग, सायटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया (सीआरएस) (पोटातील पोकळीमधील ट्युमर काढण्याची प्रक्रिया), हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी (एचआयपीईसी) (पुढच्या टप्प्यातील पोटाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया आणि विशिष्ट तापमानापर्यंत गरम केलेल्या केमोथेरपी औषधांद्वारे उपचार), गायनॅकोलॉजिक ऑन्कोलॉजी तसेच कर्करोग उपचारातील नवीन पद्धती या क्षेत्रातील तज्ञ एकत्र येणार आहेत.
ओजीपी 2026 मध्ये पेरिटोनियल सरफेसवर परिणाम करणाऱ्या कर्करोगांच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या कर्करोगांमध्ये अनेकदा गुंतागुंतीची वैद्यकीय आव्हाने निर्माण होतात आणि त्यासाठी अत्यंत विशेष कौशल्यासह बहुशाखीय उपचारांची आवश्यकता असते. या परिषदेत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, सादरीकरण आणि संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली असून, याद्वारे सहभागी डॉक्टरांना आव्हानात्मक वैद्यकीय परिस्थिती आणि उपचारांच्या बदलत्या पद्धतींवर चर्चा करता येणार आहे.
या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत तज्ज्ञांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये मेडस्टार वॉशिंग्टन हॉस्पिटल सेंटर,युएसएच्या पेरिटोनियल सरफेस मॅलिग्नन्सी विभागाचे प्रमुख प्रा. पॉल शुगरबाकर, हॉस्पिसेस सिव्हिल्स डी.ल्योन,फ्रान्सच्या जीआय (जठरांत्र) व पेरिटोनियल सरफेस मॅलिग्नन्सी सर्जरी विषयाचे प्राध्यापक ऑलिव्हियर ग्लेहेन,नायरी मेडिकल सेंटर,अर्मेनियाच्या गायनॅकॉलॉजिक ऑन्कोलॉजी सर्व्हिसचे प्रमुख प्राध्यापक आर्टेम स्टेपनॅन आणि सीएचयू मोईझेस ब्रोगी,बार्सिलोना,स्पेन येथील पेरिटोनियल सरफेस मॅलिग्नन्सीज् युनिटचे प्रमुख आणि युरोपियन स्कुल ऑफ पेरिटोनियल सरफेस ऑन्कोलॉजी (ईएसपीएसओ) चे शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक लाना बिजेलिक यांसारखे आंतरराष्ट्रीय तज्ञ सहभागी होणार आहेत.
कर्करोगाच्या उपचारांमधील प्रगतीमुळे हे अधिकाधिक दिसून येत आहे की,विशिष्ट प्रगत अवस्थेतील (स्टेज 4) कर्करोगाच्या काही निवडक रुग्णांना अधिक आक्रमक व बहुशाखीय पध्दतीचा फायदा होऊ शकतो.योग्यरित्या निवडलेल्या पात्र रूग्णांमध्ये आणि ट्युमरच्या प्रकारांमध्ये सायटोरिक्टिव्ह शस्त्रक्रिया आणि एचआयपीईसी यांसारख्या उपचार पध्दतींमुळे दीर्घकाळ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि काही बाबतीत संभाव्य रोग बरा करण्यासाठी शक्यता निर्माण होऊ शकते.
या परिषदेत कर्करोग उपचारांमध्ये बहुशाखीय आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाचे महत्त्वही अधोरेखित केले जाणार आहे. सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, गायनॅकोलॉजिक ऑन्कोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, ॲनेस्थेसियोलॉजी तसेच संबंधित आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ञ एकत्र येऊन गुंतागुंतीच्या कर्करोगांच्या बाबतीत रूग्ण परिणाम सुधारण्यामध्ये सहयोगात्मक निर्णय प्रक्रिया कशी महत्त्वाची ठरू शकते,यावर च
र्चा करणार आहेत.


