चित्ररथाची संकल्पना – कृत्रिम बुद्धिमत्ता : फायदे आणि भविष्य
पुणे, १४ सप्टेंबर: धनकवडी येथील ९ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठी संयुक्त सार्वजनिक मिरवणूक काढली. “कृत्रिम बुद्धिमत्ता : फायदे आणि भविष्य” या विषयावरील चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ एआय तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर आणि एआय तज्ज्ञ, लेखक व संशोधक डॉ. अमेय पांगारकर यांच्या हस्ते झाला. ही शोभायात्रा गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, शिवशंकर चौक ते मोहननगरपर्यंत काढण्यात आली.
याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर , माजी नगरसेवक विशाल तांबे, वर्षाताई तापकीर, बाळासाहेब धनकवडे, अभिषेक तापकीर आणि अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्याचा’* या घोषवाक्यानुसार साईनाथ मित्र मंडळ, शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव कॉम्प्लेक्स मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहननगर मित्र मंडळ यांनी एकत्रित शोभायात्रा काढली.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये युवकांनी जागतिक भाषा शिकाव्यात. शाळांपासूनच परदेशी भाषा शिकवणे गरजेचे आहे. सध्या जग दोन भागांत विभागले गेले आहे – एक ज्यांना एआय कळतो आणि दुसरे ज्यांना कळत नाही. काळानुसार एआयचे ज्ञान घेणारेच प्रगतीपथावर असतील.”
डॉ. अमेय पांगारकर म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर योग्य रीतीने होण्यासाठी मानवी बुद्धीचा वापर करावा. मंडळातील सर्व सदस्यांसाठी एआय संदर्भात ठेवलेल्या प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनाच होईल.”
प्रतीक कुंभार म्हणाले, “कल्पना जिथे असेल तिथे एआय चमत्कार करेल. माणसाची बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाची साथ यामुळे संपूर्ण जगाची वाट बदलणार आहे. हाच विषय घेऊन यावर्षी चित्ररथाची मिरवणूक काढली आहे.”
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध येवले, प्रतीक कुंभार, विजय क्षीरसागर, अभिषेक तापकीर, आनंद शिंदे, सोमनाथ शिर्के, संतोष धनकवडे, उदय जगताप, उदय भोसले, करण कदम, आदित्य झाड, उदय गुंडपाटील, अक्षय गोरे, शिरीष देशपांडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या मिरवणुकीत सुमारे ८ ते १० हजार गणेशभक्त सहभागी झाले होते. ज्ञानप्रबोधिनी पथकाने संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.


