पुणे, दि. १७ : सायबर फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने गप्प न बसता तातडीने तक्रार नोंदवावी. योग्य वेळी तक्रार केल्यास सायबर गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करणे शक्य आहे, असे मार्गदर्शन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबरतज्ज्ञ तथा सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथील गणेशोत्सवात ‘सायबर सुरक्षा जागरूकता’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी पीएमआरडीएतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एपीआय वैभव पाटील यांनी सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचावाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
आजच्या काळात सायबर गुन्ह्यांचे बळी सुशिक्षित नागरिकही ठरत आहेत. गुंतवणुकीतील मोठ्या परताव्याचे आमिष, कस्टम किंवा फेडएक्स पार्सलच्या नावाने येणारे धमकीचे फोन, वीज बिल, गिफ्ट व्हाउचर, रिवॉर्ड पॉइंट्स तसेच व्हॉट्सॲपवर वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस असल्याचे भासवून पैशांची मागणी करण्याच्या माध्यमातून फसवणूक केली जाते. अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवरून होणारी फसवणूक, बनावट कर्ज देणारे ॲप, तसेच एनीडेस्क किंवा क्विक सपोर्टसारखी ॲप डाउनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ताबा मिळविण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीवर आर्थिक विश्वास ठेवू नये, अनधिकृत ॲप डाउनलोड करू नये आणि कोणत्याही व्यक्तीला मोबाईलचा अनधिकृत प्रवेश देऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.
सायबर गुन्हेगारांना बँक खाते, एटीएम किंवा इतर आर्थिक साधने कमिशनच्या आमिषाने वापरण्यास देऊ नयेत. अशा प्रकारे खाते उपलब्ध करून दिल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवण्यासाठी ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ सुरू करावे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अज्ञात एपीके फाइल इन्स्टॉल करू नये तसेच बनावट प्रोफाइल आणि ओळख चोरीपासून सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले. गहाळ मोबाईल ब्लॉक करण्यासाठी आणि स्पॅम कॉल्सबाबत तक्रार करण्यासाठी ‘संचार साथी’ पोर्टलचा वापर करावा. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या मार्गदर्शन सत्रादरम्यान सादरीकरणाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत सायबर सुरक्षेबाबत अधिकृत व उपयुक्त माहिती पोहोचविण्यात येत आहे.
यावेळी पीएमआरडीएचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, सायबरतज्ज्ञ पोलीस कॉन्स्टेबल समीर घाडगे व शिवाजी बनसोडे यांची उपस्थिती होती. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


