पुणे, 21 सप्टेंबर 2026: भारतातील आघाडीच्या कास्टिंग्ज आणि पिग आयर्न उत्पादकांपैकी एक तसेच स्टील आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (BSE: 500245) ने 21 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अजय पाटील यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे आज जाहीर केले. त्यांची नियुक्ती प्रभावीरित्या 21 सप्टेंबर 2026 पासून 20 सप्टेंबर 2029 पर्यंत राहील.
नफ्यातील वाढ, कॉर्पोरेट प्रशासन, व्यवसाय धोरण, भांडवलाचे वाटप, उद्योग परिवर्तन, विलीनीकरण आणि अधिग्रहण, संयुक्त उपक्रम, शाश्वतता तसेच उद्योग जोखीम व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये अजय पाटील यांना 36 वर्षांचा व्यापक अनुभव आहे.
याबाबत भाष्य करताना किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (KFIL) चे व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. गुमास्ते म्हणाले, “अजय यांचे आमच्या नेतृत्व टीममध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. व्यवसाय धोरण आणि परिवर्तन क्षेत्रातील त्यांचा व्यापक अनुभव आमच्या संस्थेसाठी महत्त्वपूर्ण मूल्यवर्धन करणारा ठरेल. या नियुक्तीमुळे नेतृत्वाची क्षमता अधिक बळकट होत असून शाश्वत विकासाला चालना देत बाजारपेठेतील KFIL चे स्थान अधिक मजबूत करण्याच्या आमच्या प्राधान्यक्रमांशी हे सुसंगत आहे.”
अलिकडच्या काळापर्यंत ते बॅन कॅपिटलच्या पोर्टफोलिओ कंपनी असलेल्या आरएसबी ट्रान्समिशन (इंडिया) लिमिटेड येथे जागतिक मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सूचीबद्ध कंपन्या, खासगी इक्विटी पाठबळ असलेले व्यवसाय, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जॉइंट व्हेंचर्स म्हणजेच संयुक्त कंपन्यांमध्ये काम केले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी कमिन्स, हनीवेल आणि ईटन यांसारख्या आघाडीच्या विविधांगी औद्योगिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वाढत्या जबाबदारीची पदे भूषवली आहेत. या काळात त्यांनी आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व, आफ्रिका, अमेरिका तसेच जागतिक स्तरावरील कार्यांसाठी कार्यकारी जबाबदाऱ्या सांभाळत प्रादेशिक आणि जागतिक नेतृत्वाच्या भूमिकांपर्यंत प्रगती केली.
अजय हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रास येथील स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटीशी संबंधित कार्यरत आहेत. ते कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) असून त्यांनी वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त
केली आहे.


