पुणे, दि. २३ : पुणे शहरामध्ये काही प्रवासी ऑटोरिक्षा तसेच इतर वाहनांमधून नियमबाह्य पद्धतीने मालवाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी परवाना असलेल्या वाहनातून मालवाहतूक करण्यास परवानगी नाही. अशा वाहनातून मालवाहतूक करताना वाहन अडविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो.
ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे वैयक्तिक सामान (Luggage) सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे. मात्र, प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक सामानाव्यतिरिक्त इतर मालाची वाहतूक करण्यास परवानगी नाही. तसेच, ऑटोरिक्षाचा मालवाहतूक वाहन म्हणून व्यावसायिक वापर करता येणार नाही.
पुणे शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी तसेच इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे. परवानगी नसताना प्रवासी वाहनातून मालवाहतूक करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत कळविण्यात आले आहे.
००००


