पुणे : सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल स्काऊट गाईड खुले पथक आणि श्री शिवाजी कुल माजी कुलवीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कुलरंग महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात वंचित विकास संस्थेला यंदाचा बालकार्य सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते ८.३० यावेळेत महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गिर्यारोहक, एव्हरेस्टवीर व राष्ट्रीय साहस पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे असून, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राहुल देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, पुस्तक व रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्था १०९ व्या वर्षात पदार्पण करीत असून पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा ९ वे वर्ष आहे.
लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या हक्कासाठी आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, संस्कार, सुरक्षितता व सर्जनशीलतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘वंचित विकास’ ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने कार्यरत आहे.
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित मुलांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या संस्थेच्या कार्याचा हा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी आहे. याच वंचित विकास संस्थेचे कार्य लक्षात घेऊन संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच कुलरंग महोत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर होणार आहे.


