Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorized*चाकण-हिंजवडी परिसरातील कामाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आढावा* 

*चाकण-हिंजवडी परिसरातील कामाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आढावा* 

 

 

पुणे, दि. १ : चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पर्जन्य जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण, जंक्शन व यु-टर्नचे नियोजन तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या माध्यमातून आढावा घेतला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह एमआयडीसी, महापालिका, पोलीस, महामार्ग आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

अतिक्रमणे हटविणे, आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करणे, कामांचे नियोजन करून प्रक्रिया पूर्ण तयार ठेवावी. अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

 

चाकण परिसरातील नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, हंगामी स्वरूपाची अतिक्रमणे तातडीने हटवावीत. अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करून नाले मोकळे करावेत. परवानगी घेऊन झालेल्या बांधकामांच्या बाबतीत पर्यायी मार्गाने नाला वळविण्यासाठी आवश्यक जागेचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. एमआयडीसी आणि पीएमआरडीएने त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमणांची माहिती संकलित करावी. वाहतुकीचे प्रमाण, वाहनांची दिशा आणि भविष्यातील वाहतूक वाढ यांचा अभ्यास करून रस्त्यांची रचना निश्चित करण्यावर भर देण्यात आला.

 

राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक, यु-टर्न आणि जंक्शनबाबत ट्रॅफिक डेटा व ट्रॅफिक सिम्युलेशनचा अभ्यास करा तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ठिकाणीच अधिकृत यु-टर्न किंवा जंक्शन ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

हिंजवडी आणि चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. केवळ खड्डे बुजविण्याऐवजी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. वाहतूक नियोजनासाठी आयटीएमएस आणि ट्रॅफिक सिम्युलेशनचा वापर करून रस्त्यांच्या डिझाइनमध्ये वाहतूक व्यवस्थापनाचा समावेश करण्यावरही चर्चा झाली.

 

राष्ट्रीय महामार्ग तसेच सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे बस आणि इतर वाहने थांबविल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने केवळ अधिकृत बसथांबे व नियोजित बस डेपोवरच वाहने थांबतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनधिकृत थांबे व पार्किंगविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच एमएनजीएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांशी निगडित पाइपलाइन तसेच नदी प्रदूषणाच्या प्रश्नांवरही बैठकीत आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

गणेशोत्सवामुळे स्थगित करण्यात आलेली अतिक्रमणविरोधी कारवाई तातडीने पुन्हा सुरू करून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments