पुणे : स्वामी समर्थांच्या भक्तीचा आणि संगीताचा संगम घडविणारा ‘हटके स्वामी समर्थ वंदना’ हा विशेष संगीत सोहळा सदाशिव पेठेतील राजवाडे हॉल येथे झाला. गीत-संगीतकार संतोष अत्रे यांच्या संकल्पनेतून आणि संगीतबद्धतेतून साकारलेल्या १० नवीन स्वामी समर्थ भक्तिरचनांचा अल्बम यावेळी रसिकांसमोर सादर करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते अल्बमचे उद्घाटन करण्यात आले.
हटके म्युझिक ग्रुपच्या पुढाकाराने साकारलेल्या या अल्बमचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग गायत्री स्टुडिओज, पुणे येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमात हटके ग्रुपचे सर्वेसर्वा शिरीष कुलकर्णी यांनी हटके स्वामी समर्थ वंदना या संकल्पनेमागील भूमिका आणि अल्बमच्या निर्मितीचा प्रवास मांडला. गीत-संगीतकार संतोष अत्रे यांनी कविता आणि संगीत यांचा परस्परसंबंध तसेच भक्तिगीतांच्या निर्मितीमागील प्रवास उलगडला. ज्येष्ठ स्वामी भक्त शरद पायगुडे यांनी स्वामी समर्थांचा महिमा आणि आध्यात्मिक व मूल्याधिष्ठित जाणीवेविषयी विचार व्यक्त केले.
मोहन जोशी म्हणाले, स्वामींचे नाव घेणारा व्यक्ती जीवनात नक्कीच यशस्वी होतो. आज नाही तर उद्या त्याला यश मिळतेच. पूर्वी मी स्वामींचा भक्त नव्हतो. मात्र स्वामींचे नाव घेण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्यात बदल झाला. आता दररोज स्वामींच्या मूर्तीची पूजा केल्याशिवाय मी इतर कामांना सुरुवात करत नाही.
अल्बमच्या उद्घाटनानंतर त्यातील एका गीताचे ध्वनिमुद्रित सादरीकरण करण्यात आले. अल्बमच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या गायक-वादकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर निवडक तीन ते चार भक्तिगीतांचे मूळ गायक कलाकारांनी प्रत्यक्ष सादरीकरण केले. या अल्बममध्ये रश्मी मोघे, राहुल जोशी, धवल चांदवडकर, अनुश्री घोरपडे, डॉ. ताम्हणकर यांच्यासह विविध गायक-वादकांनी योगदान दिले आहे. गीत-संगीत निर्मितीमध्ये संतोष अत्रे यांच्यासह विविध वादक आणि तंत्रज्ञांचे योगदान आहे.
उपक्रमाविषयी शिरीष कुलकर्णी म्हणाले, भक्ती आणि संगीत यांचा संगम रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवणे हा या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश आहे. विविध कलाकारांनी एकत्र येऊन स्वामी चरणी अर्पण केलेली ही संगीतसेवा आहे. या गीतांचे पुढील एक वर्षात १०० प्रयोग करण्याचा संकल्प असून, हा हटके ग्रुपसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.


