पिंपरी, :- पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची १५६ वी जयंती तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची १२२ वी जयंती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “सत्य, अहिंसा, साधेपणा, स्वच्छता आणि सर्वधर्मसमभाव ही महात्मा गांधीजींच्या विचारांची मूलभूत तत्त्वे होती. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या जीवनात सत्याचा मार्ग स्वीकारावा, समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करावा आणि सामाजिक सलोखा व स्वच्छतेसाठी योगदान द्यावे. गांधीजींचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा उल्लेख करताना योगेश बहल म्हणाले की, “शास्त्रीजींचे जीवन साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेचे आदर्श उदाहरण आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेतून त्यांनी देशाच्या संरक्षणासाठी जवानांचे आणि अन्नसुरक्षेसाठी शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाज व देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.”
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वतंत्र भारताच्या उभारणीत या दोन्ही महान नेत्यांचे योगदान अतुलनीय आहे. सत्य, अहिंसा, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेची त्यांनी दिलेली शिकवण आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
तसेच दिवेआगर येथे झालेल्या दुर्घटनेत आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुःखद घटनेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शोक व्यक्त करून मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती उपस्थितांनी संवेदना व्यक्त केल्या.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, मा. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, कार्याध्यक्ष फझल शेख, नगरसेवक शेखर चिंचवडे, मा.नगरसेवक राजेंद्र जगताप, भोसरी विधानसभा समन्वयक प्रकाश सोमवंशी, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओवाळ, सेवादल अध्यक्ष माऊली मोरे, आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू शेळके, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संपत पाचुंदकर, बाळासाहेब पिल्लेवार, सरचिटणीस राजेंद्र पवार, रमजान सय्यद, सेवादल भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रवीण पिंजन, प्रदीप गायकवाड, मनीष शेंडगे, राजू लोणके, धनाजी तांबे, सुनील अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


