पुणे, दि. ३ ऑक्टोबर :
‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या चऱ्होली येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातर्फे गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शासनमान्य विविध पॅरामेडिकल अभ्यासक्रम मोफत चालविले जात आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, मर्यादित जागांसाठी १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
या केंद्रात जीएनॲंडएम असिस्टंट (जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी सहाय्यक), ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, वैद्यकीय अभिलेख व आरोग्य माहिती तंत्रज्ञ (मेडिकल रेकॉर्ड्स अँड हेल्थ इन्फो. तंत्रज्ञ) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा रुग्णसहाय्यक हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यार्थ्यांनी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) आणि ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) अंतर्गत येणाऱ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विद्यावेतनासाठी संबंधित संस्थांशी संपर्क साधावा. तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) या संस्थेशी संपर्क साधता येईल, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सोमवार ते शनिवार या दिवसांत सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत ७८८७६१४७०६ या क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन यांनी केले आहे.
पात्रता ः
– शैक्षणिक पात्रता : किमान १० वी उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : किमान १७ वर्षे पूर्ण.
– निवास व भोजन : पुण्याबाहेरील गरजू विद्यार्थिनींसाठी मोफत निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.
—–
‘सारथी’सोबत सामंजस्य करार :
गरजू विद्यार्थिनींना मोफत पॅरामेडिकल कोर्सेस पूर्ण करता यावेत, यासाठी स्व-रूपवर्धिनी संस्थेचे चऱ्होली येथील ‘कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र’ आणि ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे पुण्याबाहेरील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणासोबतच मोफत निवास आणि भोजनाची सुविधा मिळणार आहे. या कराराप्रसंगी ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक सतीशकुमार खडके, संचालक श्री. पासलकर आणि ज्येष्ठ अधिकारी सतीश पाटील उपस्थित होते. तर ‘स्व-रूपवर्धिनी’तर्फे संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन आणि अरविंद केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
————————-


