पुणे, दि.१२: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ हे उद्दिष्ट समोर ठेवून नगरपरिषदेमार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत नगरपरिषदेमार्फत आतापर्यंत सुमारे ३५ नवीन मालमत्ता हस्तांतरण नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ४५ नवीन नळजोडण्या देण्यात आल्या असून, शहरातील १२ विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय ६० महिला बचत गटांची नोंदणी करण्यात आली असून, नागरिकांना १८० जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या माध्यमातून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व नागरी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
अभियानाच्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासोबतच प्लास्टिकमुक्त तळेगाव दाभाडे घडविण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
नागरिकांना सुलभ व जलद सेवा मिळावी, नागरी सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि स्वच्छतेविषयी जनजागृती वाढावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांचा सहभाग वाढवून स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त शहर निर्माण करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
००००


