*चारा लागवड, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि पाणीपुरवठा योजनांतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश*
*विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा*
पुणे, दि. १६ (जिमाका) : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे निर्धारित मुदतीत पूर्ण करावेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने काम करून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. चारा लागवड, ॲग्रीस्टॅक नोंदणी, जलसंधारण आणि पाणीपुरवठा योजनांतील प्रलंबित कामेही कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*पीक पंचनामे आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीला गती*
आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील पीक पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकांमार्फत पंचनामे करून अचूक अहवाल सादर करावेत. दैनंदिन आकडेवारी अद्ययावत ठेवून पंचनाम्यांचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करावे. तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणीची पडताळणी करून प्रलंबित नोंदणी पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.
*चारा लागवड, कर्ज पुनर्गठन व जलसंधारणावर भर*
संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा लागवड वाढवावी. चारा बियाण्यांचे वितरण, रब्बी हंगामाचे नियोजन आणि पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधावा. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्ज पुनर्गठन आणि कर्जवसुलीच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. बँकांनी सक्तीची वसुली करू नये, यासाठी अग्रणी बँकेच्या माध्यमातून आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले. रोजगार हमी योजनेंतर्गत जल व मृदसंधारण, विहीर पुनर्भरण आणि चर खोदण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
*पाणीपुरवठा योजनांतील अडथळे दूर करा*
पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना विद्युत जोडणी देणे, पाइपलाइनच्या कामांतील अडथळे दूर करणे आणि आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे नियोजन करावे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.
*३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन*
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या अंदाजे ७५ ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच रब्बी हंगामासाठीही नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पीक नुकसानीचे सुमारे ८२ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी तालुकानिहाय दुष्काळी परिस्थिती आणि सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


