Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन : व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीतून हाडांच्या आरोग्याची काळजी घेणे...

जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन : व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीतून हाडांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

 

 

पुणे, १९ ऑक्टोबर २०२६ : नियमित व्यायाम, योग्य पोषण आणि निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून लहान वयापासूनच हाडांचे आरोग्य जपणे हे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे ठिसूळ होण्याचा आजार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत तज्ज्ञांनी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनाच्या (२० ऑक्टोबर) पार्श्वभूमीवर अधोरेखित केले आहे.

 

ऑस्टिओपोरोसिसला ‘सायलेंट डिसीज’ असे म्हटले जाते, कारण हाडांना फ्रॅक्चर होईपर्यंत अनेकदा या आजाराची स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. भारतात ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण ही चिंतेची बाब असून, हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे, आजाराचे वेळीच निदान करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

लोकमान्य हॉस्पिटल्स, पुणे येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल लिखते म्हणाले की, ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे कमकुवत व ठिसूळ होतात. परिणामी, मणका, खुबा, मांडीचे हाड आणि बरगड्या यांना फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अशा प्रकारच्या फ्रॅक्चरमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या हालचालींवर, स्वावलंबनावर आणि जीवनमानावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हाडे मजबूत ठेवण्याची सुरुवात बालपणापासून आणि किशोरावस्थेपासूनच होणे आवश्यक आहे. या काळात शरीरात हाडांची कमाल घनता विकसित होत असते. त्यामुळे नियमित शारीरिक हालचाली, खेळ, मैदानी खेळ आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम, केल्याने भविष्यातील हाडांचे आरोग्य मजबूत राहण्यास मदत होते. वयाच्या ३० ते ३५ वर्षांनंतर हाडांची झीज हळूहळू अधिक जाणवू लागते. त्यामुळे आधीपासूनच प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे ठरते.

 

“हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी महत्त्वाचे घटक आहेत; मात्र, केवळ पूरक औषधे किंवा जीवनसत्त्वांचे सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिस टाळता येत नाही. स्नायू बळकट करणारे व्यायाम, पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली यांनाही तितकेच महत्त्व आहे,” असे डॉ.लिखते यांनी सांगितले.

 

मध्यमवयीन व्यक्तींनीही वेळेवर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः मधुमेह, थायरॉईडचे विकार, मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार असलेल्या व्यक्ती, केमोथेरपी घेत असलेले रुग्ण, तसेच सतत पाठ किंवा खुब्यात दुखणे अथवा हालचाल करताना अडचणी जाणवणाऱ्या व्यक्तींनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

 

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर केली जाणारी बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट (बीएमडी), ज्याला सामान्यतः डेक्सा स्कॅन असे म्हणतात, हाडांची घनता तपासण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते. या तपासणीमुळे आजाराचे वेळीच निदान करून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करणे शक्य होते.

 

नियमित व्यायाम, योग्य पोषण आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेले उपचार यांचा एकत्रित अवलंब केल्यास फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यास आणि वाढत्या वयातही हालचाल करण्याची क्षमता व स्वावलंबन टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हाडांच्या आरोग्याची काळजी ही वृद्धापकाळातच नव्हे, तर आधीपासूनच घेणे

आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments