वारंवार अंगावर पित्त उठणे आणि सतत खाज सुटणे ही केवळ एक तात्पुरती त्वचेची समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करणे सोपे असते. ही लक्षणे निघून जातील या आशेने अनेकदा नवीन क्रीम लावणे, आहारात बदल करणे किंवा तात्पुरत्या आरामासाठी औषध घेणे असे उपाय केले जातात. पण, हा त्रास तुमच्या दैनंदिन कामात वारंवार अडथळा आणू लागतो, तुमच्या झोपेवर परिणाम करतो किंवा हा त्रास पुन्हा कधी उद्भवेल याबाबत चिंता वाटते, तेव्हा घरगुती उपायांच्या पलीकडे पाहण्याची वेळ आलेली असते.
क्रॉनिक अर्टिकारिया आजारामध्ये सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ अंगावर सतत पित्त उठणे, सूज येणे किंवा दोन्ही त्रास वारंवार होतात. याचाच एक प्रकार म्हणजे क्रॉनिक स्पॉन्टेनियस अर्टिकारिया (सीएसयू), यामध्ये कोणतेही बाह्य कारण किंवा ट्रिगर नसतानाही ही लक्षणे अचानक दिसू लागतात. ही लक्षणे त्वचेवर दिसत असली तरी त्यांचा परिणाम दैनंदिन आयुष्यातील अनेक पैलूंवर होतो. त्यामुळे स्वतःहून वारंवार तात्पुरते उपाय करण्याऐवजी स्पेशालिस्टचा सल्ला नेमका कधी घ्यावा हे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे या आजाराचे योग्य स्वरूप समजून घेता येईल.
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे येथील डर्माटोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख, प्रा. डॉ. विद्याधर सरदेसाई म्हणाले, “अंगावर पित्त उठणे आणि खाज येणे वारंवार घडते, तेव्हा व्यक्ती बऱ्याचदा या समस्येला आपल्या रोजच्या जगण्याचा भाग मानू लागतात. पण, सतत या त्रासामुळे झोपमोड होत असेल, कार्यक्षमतेवर परिणाम होत असेल किंवा मानसिक ताण वाढत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेतल्यास या लक्षणांमागील संभाव्य कारण शोधून काढता येते आणि त्यानुसार योग्य उपचार ठरवता येते.”
डर्माटोलॉजिस्टचा सल्ला कधी घ्यावा?
१. जेव्हा लक्षणे पुन्हा पुन्हा उद्भवतात
कधीतरी अंगावर पित्त उठणे हे आपोआप बरे होऊ शकते, पण वारंवार उद्भवणाऱ्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. अंगावर खाज येऊन चट्टे उठण्याचा त्रास सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत होत असेल, तर प्रत्येक वेळी केवळ तात्पुरते उपाय करत बसण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
अंगावर पित्त किती वेळा उठते, हा त्रास किती काळापासून पुन्हा पुन्हा होत आहे आणि या लक्षणांमुळे तुमच्या दैनंदिन कामात अडथळा येत आहे का, याकडे लक्ष द्या. तपासणीदरम्यान ही सर्व माहिती डर्माटोलॉजिस्टना दिल्यास त्यांना लक्षणांचे अचूक मूल्यांकन करणे आणि पुढील योग्य उपचारांची दिशा ठरवणे सोपे जाते.
२. जेव्हा खाजेमुळे तुमच्या झोपेवर आणि कामावर परिणाम होऊ लागतो
सतत खाजेमुळे रात्री झोपमोड होऊ शकते किंवा रात्रभर सलग झोप टिकून राहणे कठीण होऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवणे, चिडचिड होणे किंवा कामावर लक्ष केंद्रित न करता येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही सतत या अस्वस्थतेचा सामना करत असाल, तर रोजची कामे, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि अगदी साधे दिनक्रमही अधिक त्रासदायक वाटू लागतात.
याविषयी डर्माटोलॉजिस्टशी चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या जीवनशैलीच्या दर्जावर होणारा हा परिणाम समजून घेणे हा या समस्येच्या निदानाचा महत्त्वाचा भाग असतो.
३. जेव्हा मानसिक ताणाकडे दुर्लक्ष करणे आव्हानात्मक होते
अचानक उद्भवणाऱ्या या समस्येसोबत जगणे निराशाजनक ठरू शकते. अंगावर दिसणारे चट्टे किंवा सूज यामुळे इतर व्यक्तींमध्ये मिसळताना अस्वस्थ वाटू शकते किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी अचानक ही लक्षणे दिसतील का, अशी चिंता सतत सतावत राहू शकते. हा त्रास पुन्हा कधी सुरू होईल या अनिश्चिततेमुळे देखील सातत्याने मानसिक ताण येऊ शकतो.
हे अनुभव केवळ सौंदर्याशी संबंधित समस्यांपुरते मर्यादित नसतात. या समस्येमुळे तुमचा आत्मविश्वास, नातेसंबंध किंवा भावनिक स्वास्थ्यावर परिणाम होत असेल, तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आजाराचा तुमच्यावर होणारा एकूण परिणाम समजून घेतल्यास योग्य उपचारांची दिशा ठरवणे सोपे जाते.
४. जेव्हा स्वतःहून केलेले उपाय निष्फळ ठरू लागतात
हा त्रास का वाढतोय याचे कारण शोधण्याच्या प्रयत्नात अनेकदा आहारात, स्किनकेअर उत्पादनांमध्ये किंवा रोजच्या सवयींमध्ये वारंवार बदल केले जातात. काही व्यक्ती ही लक्षणे पुन्हा पुन्हा का उद्भवत आहेत हे समजून न घेता डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या औषधांवर अवलंबून राहतात.
सीएसयूच्या बाबतीत, टाळता येईल असा कोणताही ठरावीक बाह्य घटक किंवा ट्रिगर नसतो. काही गोष्टींमुळे काही व्यक्तींमध्ये ही लक्षणे अधिक तीव्र होत असली, तरी केवळ संशयित घटक टाळल्याने मूळ समस्येचे निराकरण होत नाही. अशा वेळी डर्माटोलॉजिस्ट तुमच्या लक्षणांचा, वैद्यकीय इतिहासाचा आणि तुम्ही घेत असलेल्या औषधांचा सखोल अभ्यास करून पुढील योग्य उपचारांची दिशा ठरवू शकतात.
५. जेव्हा कारणांचा शोध घेण्यात योग्य उपचारांना उशीर होतो
एखाद्या व्यक्तीचा विचार करा, ज्याला अनेक महिन्यांपासून अंगावर वारंवार पित्त उठण्याचा त्रास होत आहे. ती व्यक्ती स्किनकेअर उत्पादने बदलते, ज्या पदार्थांमुळे त्रास होत असावा असा संशय आहे ते खाणे टाळते आणि तात्पुरत्या आरामासाठी वेगवेगळे उपाय करून पाहते. ही लक्षणे पुन्हा पुन्हा उद्भवत राहतात, पण प्रत्येक वेळी त्रास काही वेळाने आपोआप कमी होत असल्याने तज्ज्ञ डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेणे पुढे ढकलले जाते.
अशा प्रकारे सीएसयूच्या रुग्णाचा हा त्रास अधिक काळ लांबू शकतो. प्रत्येक वेळी उद्भवणाऱ्या त्रासाच्या पॅटर्नला समजून घेण्याऐवजी केवळ त्या त्या वेळी आराम मिळवण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे या आजाराचे वेळेवर अचूक निदान होऊ शकत नाही. डर्माटोलॉजिस्ट ही लक्षणे सीएसयूशी संबंधित आहेत की इतर कोणत्याही समस्येमुळे आहेत हे तपासू शकतात आणि पुढील चाचण्यांची गरज आहे का ते ठरवू शकतात.
हा पॅटर्न वेळीच ओळखणे ही योग्य उपचार मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी ठरू शकते.
सतत खाज आणि अंगावर वारंवार पित्त उठणे हे तुमच्या रोजच्या जगण्याचा सामान्य भाग बनू नये. ही लक्षणे सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहत असतील, स्वतःहून केलेले उपाय करूनही पुन्हा उद्भवत असतील किंवा तुमच्या झोपेवर, कामावर, तसेच मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतील, तर डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घ्या. डॉक्टरांची मदत घेणे म्हणजे केवळ पुढच्या वेळी होणाऱ्या त्रासापासून तात्पुरता आराम मिळवणे नव्हे, तर या समस्येचे मूळ स्वरूप समजून घेऊन योग्य व्यवस्थाप
न करण्याचा मार्ग शोधणे हा आहे.


