पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२६ : पुण्यातील कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स (केआरए ज्वेलर्स) या नामांकित सुवर्णपेढीतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त ‘स्त्री शक्ती सन्मान’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, पोलीस, वकील, डॉक्टर, खेळाडू यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे ३८० ते ४०० महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
याविषयी बोलताना केआरए ज्वेलर्सचे संचालक अतुल अष्टेकर म्हणाले, “नवरात्रीमध्ये आपण स्त्री शक्तीचा गौरव करतो. मात्र, आपल्या दैनंदिन आयुष्यातही अनेक महिला विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असतात. घराची जबाबदारी पार पाडतानाच त्या आपल्या क्षेत्रात काम करतात, स्वतःची ओळख निर्माण करतात आणि समाजासाठीही योगदान देतात. अशा महिलांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला. पोलीस, वकील, डॉक्टर, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा या माध्यमातून गौरव करण्यात येतो.”
“स्त्री सक्षमीकरणाबद्दल केवळ बोलण्यापेक्षा महिलांवर प्रत्यक्ष विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. केआरए ज्वेलर्समध्ये सध्या ४८ टक्के महिला कर्मचारी आहेत, तर खरेदी विभागासारख्या महत्त्वाच्या विभागात महिलांचे प्रमाण सुमारे ९० टक्के आहे. महिलांना संधी आणि जबाबदारी दिल्यास त्या उत्तम कामगिरी करू शकतात, यावर आमचा विश्वास आहे. आम्ही जे सांगतो, ते कृतीतूनही दाखवतो,” असे अष्टेकर यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर, बारामती, सातारा आणि पुणे येथील केआरए ज्वेलर्सच्या दालनांमध्ये विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे बालविकास अधिकारी सविता बिक्कड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती फड, बारामती येथे महिला शिक्षिका व वकील, तर सातारा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशा मोहोद, प्रियंका बाबर आणि शहापुरी पोलीस ठाण्यातील निर्भया अधिकारी जास्मिन पाटील यांचा गौरव करण्यात आला.
पुण्यातील सोन्या मारुती चौक येथे राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू कृष्णाई वाघमारे, कोथरूड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरी शिंदे व त्यांच्या सहकारी तसेच महिला डॉक्टर, नगर रोड येथे महिला डॉक्टर व वकील, सिंहगड रोड येथे पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे आणि माधुरी काजळे व त्यांच्या सहकारी, वरिष्ठ लिपिक, तर औंध येथे पोलीस निरीक्षक शितल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सर्व महिलांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
‘स्त्री शक्ती सन्मान’ या उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेण्याबरोबरच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केआरए ज्वेलर्सतर्फे करण्यात येत आहे.


