विदर्भ संशोधन मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या स्व. सरोजबेन कोठारी स्मृति ग्रंथ पुरस्कारासाठी प्रा
डॉ.रामदास चवरे यांनी अथक परिश्रम करून
लिहिलेल्या कलाली-मराठी शब्दकोश या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार समारंभ,शनिवार दि.३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं.७ वाजता मंडळाच्या डॉ.वा.वि.मिराशी सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.या निमित्ताने या कोशाचे महत्व, स्वरुप विशद करणारा हा लेख.
प्रा डॉ.रामदास चवरे यांचे
मनःपूर्वक अभिनंदन. न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले आहे
महाराष्ट्रात विविध बोली भाषा आहेत. त्यापैकीच पूर्व विदर्भात बोलली जाणारी एक बोली भाषा म्हणजे ‘कलाली’ होय. ही कलाली भाषा कलाल हा समाज तर बोलतोच मात्र इतरांनाही ती बोलता यावी, निदान समजावी, या बोलीतील शब्द कळावेत, विविध शब्दांचा अर्थ माहीत व्हावा , तो जाणून घेता यावा यासाठी कलाली भाषेचा पहिला आणि ऐतिहासिक दस्तावेज डॉ. रामदास चवरे यांनी उपलब्ध करून दिला आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ ,खासगी संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरेल. विशेष करून काॅलेज, विद्यापीठात शिकणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि संशोधनासाठी हा कोश फायदेशीर ठरणार आहे.
डॉ. रामदास चवरे हेगेल्या ४०-४५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राध्यापक, प्राचार्य असा त्यांचा प्रवास राहिला आहे. ते साहित्यिक आणि संशोधक असल्यामुळे त्यांचा हा शब्दकोश अधिकच व्यापक आणि एकमेव कायमस्वरूपी ठेवा आहे ,यात शंका नाही. कविता, कथा, कादंबरी, ललित, संशोधनात्मक पुस्तके तसेच ‘असो चैतको मयना’ या कलाली बोलीतील कवितासंग्रहाची त्यांनी निर्मिती केली आहे.
डॉ. चवरे हे विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या मुऱ्हा या गावातील असल्यामुळे त्यांना ग्रामीण वजा शहरी भागातील लोकांचे राहणीमान, त्यांचे वागणे, बोलणे, सवई, भाषा आदींचा चांगलाच अभ्यास आहे. कोणत्या शब्दाला काय म्हणतात, याची त्यांना पुरेपूर माहिती आहे. यासाठी त्यांना विदर्भाच्या अनेक ठिकाणी जाऊन सर्व तपशील गोळा करावा लागला. शिवाय लोकांशीही बोलावे लागले, चर्चा करावी लागली. विदर्भात कलाल समाजाची लोकसंख्या बरीच असल्यामुळे आणि त्यांच्याशी डाॅ. चवरे यांचा जवळचा संबंध आल्याने त्यांच्या शब्दकोश निर्मितीत मोलाची भर पडली आहे.
कलाली मराठी शब्दकोशात कलाली भाषेत बोलल्या जाणाऱ्या सर्व शब्दांचा समावेश करण्याचा प्रयत्न डॉ. चवरे यांनी केला आहे. कोणताही शब्दकोश परिपूर्ण नसतो. त्यात भाषेतील शब्दांचे अर्थ दिलेले असतात हे सर्वांना माहीत आहे. कलालीत कित्येक शब्द हिंदी भाषेतील असल्याचे देखील प्रतीत होते. विदर्भाच्या काही भागात कलाल समाज मराठी किंवा वऱ्हाडी बोली बोलताना दिसतो. आपसातील संभाषणासाठी कलाली ठीक आहे. परंतु महाराष्ट्रातील प्रचलित भाषाही त्यांच्या कानावर पडत असते. परिणामी कलाली भाषा नकळत मागे पडते किंवा तिच्यात इतर भाषेतील शब्द डोकावतात.
आता कलालीतील अनोखे शब्द पाहू. ‘बिहाव’ या कलाली भाषेतील शब्दाचा अर्थ मराठीत लग्न असा होतो. अनेकजण तोच शब्द वापरतात. ‘मी लगन लगावनखे चल्यो’ म्हणजे मी लग्न लावण्यासाठी चाललो असा होतो. लगन हा वऱ्हाडी तर लग्न हा प्रमाण मराठी भाषेतील शब्द आहे. वऱ्हाडीच्या संस्कारामुळे वऱ्हाडात कलालीमध्ये वऱ्हाडी शब्द येतात. मराठीत ‘मोडक्या’ तर कलालीत ‘मोळको’असे म्हणतात. तोडणे हा मराठी शब्द तर कलालीत तोळणे, मराठीत लाडू तर कलालीत लाळू, मराठीत ‘घडीभर’ तर ‘घळीभर’ असे कलालीत म्हणतात. थोडक्यात, कलालीतील शब्द आपल्याला समजतात. मराठीत ‘ड’ चा कलालीमध्ये ‘ळ’ होतो. अशा कितीतरी शब्दांचा समावेश या शब्दकोशात लेखकाने केला आहे. हिंदी भाषेतील कित्येक शब्द देखील कलालीत असल्याचे दिसून येते. उदा. ‘उपरसे’ हा हिंदीतील शब्द आहे. कलालीत तो ‘उप्परसे’ असा होतो. बढई हा हिंदी शब्द तर कलालीत ‘बळई’ असा बदल होऊन कलालीत शब्दांचे आगमन होताना दिसते. तर काही इंग्रजीतील शब्द जसेच्या तसे बोलले जातात. इंग्रजीतील शब्दांना पर्यायी शब्द असले तर त्याचा वापर केला जात नाही. तर सर्रास इंग्रजीतील शब्द जसेच्या तसेच बोलतात. उदा. टीव्ही, कंप्युटर, पेन, पेन्शील, काॅलेज, टेबल इ.
कलाली संस्कृती व तिची भाषा यांचे एक मौलिक क्षेत्र आहे. ही भाषा बोलणारे तिचा अवलंब करतात. त्यात त्यांना मानसिक शांती व सुख-समाधान मिळते. कारण ही भाषा त्यांना अधिक जवळची वाटते.
महाराष्ट्रात मराठी आणि कलाली भाषेचा अधिकच जवळचा संबंध आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात कलाल समाजाची लोकसंख्या बरीच आहे. अकोला जिल्ह्यातील अकोलखेड या गावी या समाजाची लोकसंख्या बरीच असल्यामुळे या भागात ती अधिक बोलली जाते. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या पूर्व विदर्भातही ती अधिक बोलली जाते. परंतु ज्या भागात ते राहतात त्या भागातील भाषेशी म्हणजे मराठी भाषेशी जवळचा संबंध येत असल्यामुळे मराठीचा ते अधिक वापर करतात. थोडक्यात आपल्या वस्तीच्या भोवताली जी भाषा बोलली जाते, तिच्यातील काही शब्द कलालांनी आपल्या भाषेत समाविष्ट केलेत. शिवाय शिक्षणामुळेही मराठी, हिंदी, इंग्रजी शब्द त्यांच्या भाषेत डोकावत आहेत. तसे अनेक आदिवासी बोलीच्या बाबतीत घडत असल्याचे पुरावे आहेत. आंध या जमातीची बोली नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तसेच कलाली देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
बदल होणे हा सृष्टीचा नियम आहे. तसा समाज, मानवी जीवन, संस्कृती यांनाही तो लागू पडतो. म्हणून या विविध घटकांतील बदलानुसार भाषांत नवीन शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांची भर पडत असते. त्यानुसार त्यांचा या शब्दकोशात लेखकाने समावेश केला आहे. तसेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदाचे कोणते शब्द असतात, त्याचाही उहापोह या शब्दकोशात करण्यात आला आहे.
या शब्दकोशात कलाली शब्दांचा अर्थ दिला आहे. एखाददुसरा शब्द इतर भाषांतील असला तरी तो नेहमीच्या वापरामुळे कलाली बोलीचा वाटतो. कलाली भाषेतील शब्द बारकाईने निरीक्षण केल्यास ते समजण्यासारखे आहेत. पश्चिम विदर्भात मले, तुले, येणंबे, जाणंबे, काय करून रायला, असे शब्द उच्चारले जातात. वऱ्हाडातही विशेषता अमरावती, अकोला या जिल्ह्यातही जवळपास असेच शब्द वापरतात. तर बुलढाणा जिल्ह्यात तुनं, मिनं, कवा, तवा असे तर जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात अहिराणी बोलीचा वापर होतो. म्हणजे प्रदेशानुसार भाषा बदलते. कारण ती त्यांच्या अंगवळणी पडलेली असते.
डॉ. चवरे यांनी अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, आॅ,औ, अं अशी तर इंग्रजीतील अल्फाबेट प्रमाणे क, ख, ग, घ, च, छ असा वर्णमालेचा उपयोग करुन कलालीतील अ, ब, क, ख,ड आदींनुसार कोणकोणते शब्द आहेत याचा अभ्यास करून तशी त्यांनी या शब्दकोशात मांडणी केली आहे. सामान्यत: कोशात सिद्ध शब्दाचा अर्थ दिलेला असतो. मात्र सर्वांच्या आकलनासाठी डॉ. चवरे यांनी त्या व्यतिरिक्त कित्येक शब्दांचा अर्थ दिलेला आहे. उदा.’पंघरणखे’ या शब्दाचा लेखकाने अर्थ दिलेला आहे, पांघरायला. मूळ शब्द किंवा सिद्ध शब्द आहे ‘पंघरणे’. मात्र डॉ. चवरे यांनी अनभिज्ञ वाचकांचा विचार करून असे अनेक शब्द कोशात समाविष्ट केले आहेत.
कलालीमधील अनेक शब्दांचा विदर्भातील मराठी शब्दांशी जवळचा संबंध असल्यामुळे ते सहज समजतात. पण कलालीतील काही शब्द नवीनच वाटतात. मात्र कलालांच्या ते अंगवळणी पडलेले असल्याने त्यांना सहज वाटतात. नवीन वाचकास मात्र त्याचे कुतूहल वाटते. कलालीमध्ये जसे ‘अकरी’ आली म्हणजे बदमाशी, नियत फिरली, असा अर्थ होतो. अकळ हा मराठी तर अकळखे हा कलालीतील शब्द सहज समजतो. त्याचा मराठीत अर्थ अकड, तोरा, अडकून, जास्त भाव खाऊन असा होतो. अकळणे, अकळणो, अकळ या कलालीतील शब्दांचा मराठीत गारठणे, रुसते, भाव खाणे असा अर्थ होतो. तर अकळेलचा अर्थ ऐटबाज, गर्विष्ठ, अहंकारी असा होतो. अकात म्हणजे आकांत, आक्रोश. अकात्या म्हणजे खादाड, खात सुटणारा. ‘उलय’ हा नवीनच शब्द आपण ऐकतो. कलालीतील या शब्दाचा अर्थ उलते, उलतो, तडा जाणे आदी. उलथोपालथो म्हणजे पोटापाठीवर, पोटावर, पाठीवर. उलथाव म्हणजे उलटी कर, भाकर फिरव असा अर्थ होतो. एकमेक म्हणजे दोघे जण, एककनांग-एका बाजुने, एका बाजुला. एकीको- ऐक्याचे, एकीचे. एकीसे-ऐक्याने, एके जगा – याच्याजवळ. ‘एखांदो’ हा कलालीतील शब्द समजणारा आहे. याचा मराठीत अर्थ एखादा. एळूमेळू -गोलमेल, ऐनक म्हणजे चष्मा. ऐना- खास, ऐनामाल – खास पदार्थ. ओक-उलटी कर, ओकी-उलटी म्हणजे त्याची, ओकेने – त्याच्यामध्ये, ओरख -ओळख, परिचय. ओर म्हणजे शिजायला ठेव. ओरपने – जोराने भुरका मारणे, ओलो दुष्काळ – ओला दुष्काळ. ओरबखे -ओरबाळून, औतपाळ्या म्हणजे काम नासाड्या, औंदा-या वर्षी – यंदा, अंधरा-आंधळा किंवा दृष्टीहीन, अंधात ना मंधात-कुचकाम्या. ककई-फणी, कंगवा, बिचरी, ककळी म्हणजे काकडी, एक फळ, कथळी-वाकळ, गोधडी. कबसे – कधीचा, केव्हाचा. कबरो म्हणजे करड्या रंगाचा, ठिपक्या ठिपक्याच्या, करणी-जादूटोणा, करणो लायक -करण्यायोग्य, करपटला -अतिकंजुष, करय सो भरय -करतो तसा भरतो. करम – कर्म,नशीब, करस – कळस, मंदिराचा कळस, कल्लू- कानातील दागिना. त्याचप्रमाणे नातेसंबंध जसे कलालीमध्ये माय तर मराठीत आई, कलालीत मुलाला टुरा म्हणतात तर मराठीत मुलगा, कलालीत मुलीला ‘टुरी’ तर मराठीत मुलगी असा अर्थ होतो. लायनो भाई म्हणजे लहान भाऊ, फूपू- आत्या, लाळा- नवरा, लुगाईन- बायको असे. तसेच रंगांच्या नावाच्या बाबतीतही तसेच आहे. कलालीत हिरवो तर मराठीत हिरवा, पांडरो-पांढरा, जांबरो-जांभळा, सेंदरो-सेंदरी, पिवरे – पिवळे, सावरा-सावळा आदी. काळ/वेळ, ऋतू/दिनचक्र, नक्षत्रे, वार, महिन्यांची नावे, शरीराचे अवयव, अंक, माटे, शेती आणि व्यवहार आदीसारखे विषय व त्यातील शब्दांचा लेखकाने बारकाईने विचार केलेला असल्याचे या शब्दकोशात दिसून येते. या कोशामुळे कोश भांडारात बौद्धिक भर पडली आहे, यात शंका नाही.
डॉ. रामदास चवरे लिखित ‘कलाली – मराठी शब्दकोश’ हा २८६ पानांचा साडे सहाहजार शब्दांचा ग्रंथ उत्कृष्टरित्या तयार करण्यात आला असून ग्रंथाची छपाई देखील सुबक आहे. पुण्याच्या यशोदीप प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे. हा ग्रंथ शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि सार्वजनिक वाचनालयांनी आपल्या संग्रही निश्चितच ठेवावा असा आहे. त्यातून वाचकप्रेमींना वाचतांना गोडी लागेल विशेष करून विद्यार्थी व संशोधक विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. तसेच असे दुर्मिळ ग्रंथ वाचकप्रेमींनी आपल्या संग्रही ठेवले पाहिजेत, असे मला वाटते.
– शेषराव वानखेडे.
– जेष्ठ पत्रकार.
– +91 9869484800


